उरण : चिरनेर-खारपाडा रस्त्यावरील आर्शिया लॉजिस्टिक सर्व्हिसेस लिमिटेड या गोदाम कंपनीत गेल्या दहा वर्षांपासून काम करीत ४०० कामगारांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी बुधवारपासून ८ जानेवारी काम बंद आंदोलन सुरू केले. मात्र, कामगारांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी बाहेरून कामगार आणून काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केल्याने कंपनी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. आंदोलनादरम्यान व्यवस्थापनाकडून कामगारांनाही मारहाण करण्याचा प्रकार घडल्याने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.आशिया खंडात एकूण १८ प्रोजेक्ट असलेल्या साई येथील आर्शिया गोदाम उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या आहेत. स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, या आशेने शेतकऱ्यांनीही आपल्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावात कंपनीसाठी दिल्या.कंपनीत येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त असलेले कामगार लेबर, सुपरवायझर, हाउसकिपिंग, सिक्युरिटी, सर्व्हेअर, आरटी आॅपरेटर, बीओएल आॅपरेटर व पँटरीबॉय अशा विविध पदांंवर एकूण ४०० कामगार गेल्या दहा वर्षांपासून काम करीत आहेत. त्यात २५ महिला कामगारांचाही समावेश आहे.मागील महिन्यांपासून वेतनवाढीच्या मागणीसाठी कामगारांची कंपनी व्यवस्थापनाबरोबर बोलणी सुरू होती. त्यानंतर वेतनवाढीचा करारही करण्यात आला. मात्र, काही दिवसांपूर्वी केलेल्या करारानुसार, वेतन देण्याच्या मागणीप्रमाणे कामगारांना वेतन दिले जात नसल्याने कंपनी व्यवस्थापनाविरोधात संघर्ष सुरू झाला आहे. त्यानंतरही वेतनवाढीच्या प्रश्नाकडे कानाडोळा केला जात असल्याच्या निषेधार्थ ४०० कामगारांनी बुधवारपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. आर्शिया लॉजिस्टिक व्यवस्थापनाने या कामगारांना विश्वासात न घेता, तत्काळ बाहेरून कामगार आणून कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकरणी विचारणा करण्यासाठी गेलेले कामगार समाधान कृष्णा तांडेल (३२) यांना व्यवस्थापनाकडून शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली.कंपनी व्यवस्थापन कराराप्रमाणे कामगारांना वेतन देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. तसेच बळाचा वापर करीत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आर्शिया करत असल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे. ४०० संघटित कामगारांनी आर्शिया लॉजिस्टिक सर्व्हिसेस विरोधातील काम बंद आंदोलन आणखीनच तीव्र केले आहे. व्यवस्थापन आणि कामगारांमधील संघर्ष आणखीनच पेटला आहे.
वेतनवाढीसाठी ४०० कामगारांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:28 AM