CoronaVirus News: लॉकडाऊनच्या १६ दिवसांत ४,०८१ रुग्ण; यापुढे सरसकट बंदला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 11:51 PM2020-07-20T23:51:30+5:302020-07-20T23:51:43+5:30

नवी मुंबईतील कंटेन्मेंट झोनमधील निर्बंधांच्या निर्णयाचे स्वागत

4,081 patients in 16 days of lockdown; No longer opposed to a total bandh | CoronaVirus News: लॉकडाऊनच्या १६ दिवसांत ४,०८१ रुग्ण; यापुढे सरसकट बंदला विरोध

CoronaVirus News: लॉकडाऊनच्या १६ दिवसांत ४,०८१ रुग्ण; यापुढे सरसकट बंदला विरोध

googlenewsNext

- नामदेव मोरे 

नवी मुंबई : शहरातील १६ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात तब्बल ४,०८१ कोरोना रुग्ण वाढले असून, १११ जणांचा मृत्यू झाला आहे. मनुष्यबळाअभावी संपूर्ण शहरभर लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करून घेणे मनपा व पोलीस प्रशासनास शक्य होत नाही. यामुळे फक्त कंटेन्मेंट झोनपुरतीच बंदी करण्यात यावी, अशी मागणी व्यापारी संघटनांसह लोकप्रतिनिधींनीही केली असून, व्यवसायासाठी वेळ वाढवून मिळावी, यासाठी आयुक्तांना निवेदन दिले आहे.

नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ४ जुलैपासून संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या कालावधीमध्ये नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत होते. अनेक नागरिक मास्क न वापरता व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करून शहरात फिरत असल्याचे निदर्शनास आले होते. महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करता येत नव्हती.

३ जुलैला शहरात कोरोना रुग्णांची संख्या ७,३४५ होती. पुढील १६ दिवसांत हा आकडा ११,४२६ वर पोहोचला असून, तब्बल ४,०८१ रुग्ण वाढले आहेत. लॉकडाऊनच्या काळात मृतांचा आकडा २३२ वरून ३४३ झाला असून, तब्बल १११ जणांचा या कालावधीमध्ये मृत्यू झाला आहे. यामुळे पुन्हा सरसकट लॉकडाऊन वाढविण्यास शहरवासीयांनी विरोध दर्शविण्यास सुरुवात केली होती. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनीही सरसकट शहरातील व्यवहार बंद ठेवण्याऐवजी हॉटस्पॉट असलेल्या ४२ ठिकाणीच ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचे शहरवासीयांनीही स्वागत केले असून, जिथे लॉकडाऊन आहे, तेथे त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना केल्या.

सरसकट लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका छोट्या व्यावसायिकांना बसला आहे. व्यवसाय बंद असल्यामुळे दुकानांचे भाडे देता येत नाही. देखभालीवरील खर्च वाढत आहे. कर्मचाऱ्यांना वेतन देता आलेले नाही. अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आहे. नागरिकांनाही गरजेच्या वस्तूंची खरेदी करता येत नाही. पंखे किंवा घरातील इतर इलेक्ट्रिक वस्तू नादुरुस्त झाल्या असल्याने त्यांची दुरुस्ती करता येत नव्हती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घरांमधील किरकोळ दुरुस्तीची कामेही करता येत नव्हती. महानगरपालिकेने नागरिकांमध्ये कोरोनापासून संरक्षणासाठी जनजागृती करावी. मास्कचा वापर न करणारे व गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करावी, परंतु पूर्ण शहर पुन्हा बंद करू नये. सर्व व्यवहार सुरक्षितपणे सुरळीत चालतील, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. दुकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंतच सुरू ठेवावी, असे निर्बंध घातले असून, ते शिथिल करून वेळ वाढवून देण्याची मागणी केली.

नवी मुंबईमध्ये पुन्हा सरसकट लॉकडाऊन करण्यात येऊ नये. कंटेन्मेंट झोनमध्येच लॉकडाऊन ठेवावा. ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत असून, त्यांच्यामध्ये मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेऊन विशेष काम नसल्यास घराबाहेर पडू नये, यासाठी जनजागृती करण्यात यावी. ज्येष्ठांसाठी सोलापूर पॅटर्न नवी मुंबईत राबवावा.
- किशोर पाटकर, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

कंटेन्मेंट झोनपुरता लॉकडाऊन करण्याचा निर्णय योग्य आहे. सरसकट शहर बंद करणे योग्य नाही. संपूर्ण लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणीही करता येत नाही. नियमांचे पालन करून सर्व व्यवहार सुरू राहावे. व्यवसायासाठी वेळ वाढवून देण्याची गरज आहे.
- नामदेव भगत, माजी सिडको संचालक

जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात

महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी लॉकडाऊन ४२ कंटेन्मेंट झोनपुरता मर्यादित केल्यामुळे सोमवारी शहरातील अनेक दुकाने सुरू झाली. हार्डवेअर, इलेक्ट्रिक, मोबाइल, कपडे, शूज व इतर दुकानेही सुरू करण्यात आली आहेत. शहरातील जवळपास ८० टक्के छोट्या दुकानदारांनी त्यांचे व्यवसाय सुरू केले. काहींनी दुकानांची साफसफाई सुरू केली आहे. नियमांचे पालन करून व्यवसाय सुरू ठेवावा, नियम तोडतील त्यांच्यावर कारवाई करावी, नियमांचे पालन व्हावे, यासाठी व्यापक जनजागृती व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व व्यावसायिकांनीही व्यक्त केली आहे.

शहरात सरसकट लॉकडाऊन वाढविण्यास व्यापारी महासंघाने विरोध केला होता. आयुक्तांनी या मागणीची दखल घेऊन फक्त ४२ कंटेन्मेंट झोनमध्येच लॉकडाऊन सुरू केला आहे. यामुळे जनजीवन पूर्ववत होण्यास मदत होणार आहे. यापुढे दुकानांची वेळ वाढवून मिळावी, यासाठी आम्ही निवेदन दिले आहे.
- प्रमोद जोशी, सरचिटणीस, नवी मुंबई व्यापारी महासंघ

Web Title: 4,081 patients in 16 days of lockdown; No longer opposed to a total bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.