मयूर तांबडेनवीन पनवेल : गणपतीबाप्पांच्या विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पनवेल महापालिकेने ४१ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याचे ठरविले आहे. हे तलाव ४ बाय ६ फूट लांब-रुंद आणि चार फूट खोल असतील. तर, तलावांसाठी एकूण १०० लोखंडी टाक्या बनविण्यात आलेल्या आहेत.पनवेल महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर घरगुती आणि सार्वजनिक बाप्पांचे आगमन होते. ग्रामीण भागात तर घरोघरी गणेशमूर्ती बसविल्या जातात. त्यामुळे विसर्जनावेळी तलावांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. सध्या पनवेल पालिका हद्दीत दररोज शेकडोंच्या संख्येने कोरोना रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे होणारी गर्दी टाळून सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन करण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिका विसर्जन घाटाशेजारी लोखंडी टाक्यांचे ४१ कृत्रिम तलाव उभारणार आहे. पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे पनवेल परिसरात गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव उभारण्यात यावेत, अशी मागणी केली होती. ज्यांना घरी किंवा सोसायटीच्या आवारात विसर्जन करणे शक्य नाही त्यांनी कृत्रिम तलावाजवळ असलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे बाप्पाची मूर्ती द्यायची आहे. मात्र मूर्ती घेऊन जाताना दोनच माणसांनी जायचे आहे. त्यानंतर पालिका कर्मचारी विधिवत कृत्रिम तलावांत बाप्पांचे विसर्जन करणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.
बाप्पांच्या विसर्जनासाठी पनवेल परिसरात ४१ कृत्रिम तलाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 1:38 AM