नवी मुंबईत हुक्का पार्लर, पब्जसह  हॉटेल्सच्या ४१ अतिक्रमणांवर हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 09:58 AM2024-07-02T09:58:19+5:302024-07-02T09:58:43+5:30

महापालिका-पोलिसांची मोहीम : रविवारच्या रात्रीपासून सोमवारच्या पहाटेपर्यंत धडक कारवाई

41 encroachments of hookah parlors, pubs and hotels in Navi Mumbai | नवी मुंबईत हुक्का पार्लर, पब्जसह  हॉटेल्सच्या ४१ अतिक्रमणांवर हातोडा

नवी मुंबईत हुक्का पार्लर, पब्जसह  हॉटेल्सच्या ४१ अतिक्रमणांवर हातोडा

नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर नवी मुंबई महापालिका आणि पोलिसांनी शहरातील हुक्का पार्लर, बार, पब्जच्या अतिक्रमणांवर धडक कारवाई सुरू केली आहे. रविवारी (३० जून) रात्री १० पासून सोमवारी पहाटे ४ वाजेपर्यंत शहराच्या विविध भागांतील ४१ अतिक्रमणांवर हातोडा चालवण्यात आला. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

नवी मुंबई पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरातील अतिक्रमणांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. झोपड्या, अनधिकृत इमारतींबरोबरच हॉटेलचालकांच्या अतिक्रमणांवर कारवाई करून दंडही वसूल केला जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. यानंतर नवी मुंबईतील हाॅटेल, बार, पब्ज, लॉज, हुक्का पार्लरविरोधात पोलिस आणि महापालिकेने संयुक्त मोहीम सुरू केली आहे. 

आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांनी रात्री १० वाजता एकाच वेळी बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली आणि घणसोली विभागात बेकायदा बांधकामविरोधी मोहीम सुरू केली. अनेक हाॅटेलचालकांनी मार्जिनल स्पेसचा व्यवसायासाठी वापर सुरू केला होता. पावसाळी शेडच्या नावाखाली पक्के बांधकाम करून त्याचा व्यावसायिक वापर करण्यात येत होता. त्या सर्व अतिक्रमणांवर सरसकट कारवाई करण्यात आली. 

सोमवारी पहाटे ४ वाजेपर्यंत हॉटेलचालकांनी बांधलेल्या शेड्स, वाढीव बांधकाम पाडण्यात आले. रात्री सुरू झालेल्या कारवाईमुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शहरातील हॉटेलचालकांची सर्व अतिक्रमणे हटवेपर्यंत मोहीम सुरूच ठेवली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. कारवाईदरम्यान स्वत: आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त डॉ. राहुल गेठे शहरभर फिरून कारवाईचा आढावा घेत होते. याशिवाय, विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, डॉ. अमोल पालवे, सागर मोरे, सुनील काठोळे, संजय तायडे, अशोक आहिरे हेही रात्रभर कारवाईवर लक्ष ठेवून होते. 

नवी मुंबईमधील हॉटेलसह सर्व प्रकारच्या अतिक्रमणांविरोधात नियमित कारवाई केली जात आहे. रविवारी रात्री बेलापूर ते ऐरोलीदरम्यान ४१ हॉटेल्स, पब्ज, हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. - डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

नगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे हॉटेल, बारच्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. कारवाईसाठी आवश्यक तो बंदोबस्त पुरविण्यात येत आहे.  - पंकज डहाणे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १ 

कारवाई केलेली हॉटेल्स

वाशी विभाग : हॉटेल गोल्डन सुट्स, टेरेझा वाशी प्लाझा, अंबर रेस्टॉरंट
कोपरखैरणे विभाग : आदर्श बार सेक्टर १ ए 
घणसोली विभाग : एमएच ४३ रेस्टॉरंट ॲण्ड बार, मोनार्क रेस्टॉरंट व बार, सीएनपी पंपावरील अनधिकृत होर्डिंग, मल्लिका बार व रेस्टॉरंट, मिडलँड हॉटेल रेस्टॉरंट.
ऐरोली विभाग : सेक्टर १ मधील अनधिकृत शेड, ऐरोली नाक्यावरील चायनीस हॉटेलचे अतिक्रमण, सेक्टर १९ मधील कृष्णा हॉटेल.

बेलापूर विभाग : व्हीआयपी बार, धूम नाइट, नाइट अँगल, कबाना, बेबो, स्टार नाइट, लक्ष्मी हॉटेल, महेश हॉटेल, अश्विथ हॉटेल, स्पाइस ऑफ शेड, घाटी अड्डा, ब्रु हाऊस कॅफे, रूड लॉन्च, निमंत्रण हॉटेल, बहाणा, कॅफे नाईटिन, बार मिनिस्ट्री, बार स्टॉक एक्स्चेंज, नॉर्दन स्पाइसेस, कॉफी बाय डी बेला, दि लव्ह ॲण्ड लाटे, सुवर्डस कॅफे, मालवण तडका.

नेरूळ विभाग : साई दरबार हॉटेल, भारती बार, गंगासागर जॉल, सिल्व्हर पॅलेस कॅफे, शानदार हुक्का पार्लर- शिरवणे, सत्यम लॉज शिरवणे.

 

Web Title: 41 encroachments of hookah parlors, pubs and hotels in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.