पनवेलमध्ये डेंग्यूचे ४१ संशयित रुग्ण, महिनाभरात दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 04:05 AM2018-08-13T04:05:39+5:302018-08-13T04:05:50+5:30
पनवेल महपालिका क्षेत्रात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. विशेषत: डेंग्यूच्या संशयित रुग्णांत लक्षणीय वाढ झाल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पनवेल - पनवेल महपालिका क्षेत्रात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. विशेषत: डेंग्यूच्या संशयित रुग्णांत लक्षणीय वाढ झाल्याने रहिवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका कार्यक्षेत्रात आतापर्यंत डेंग्यूचे ४१ संशयित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, डेंग्यूने मागील महिनाभरात दोन जणांचा जीव घेतला आहे. या पार्श्वभूमीवर डेंग्यूला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेकडून कोणत्याही ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत.
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांनी डोके वर काढू नये, रोगराईला आळा बसावा, यासाठी पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात नोटिसा बजावण्यात येत आहेत. त्यानंतरही डेंग्यूचे प्रमाण वाढताना दिसत आहे. डेंग्यूपासून बचावासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पालिकेकडून घरोघरी जाऊन डेंग्यूच्या अळ्या शोधल्या जात आहेत. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी तालुक्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून औषध फवारणी करण्याचे काम हाती घ्यायला हवे. तालुक्यातील आपटा येथे १, गव्हाण ५, तर वावंजे १, नेरे १ आणि अजिवली येथे ३ असे एकूण ११ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. तर पालिका हद्दीतील खारघर ११, कामोठे २, कळंबोली १, पनवेल, नवीन पनवेलमध्ये १६ डेंग्यूचे संशयित रु ग्ण आढळले आहेत. तर उरण तालुक्यातील एकूण पाच डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले आहेत.