नेरूळमध्ये ४११ किलो प्लॅस्टिक जप्त, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 02:51 AM2019-07-05T02:51:43+5:302019-07-05T02:51:52+5:30
नेरूळमध्ये दोन ठिकाणी छापा टाकून ४११ किलो प्लॅस्टिक जप्त करून पालिकेच्या ताब्यात दिले आहे.
नवी मुंबई : प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लॅस्टिकविरोधात मोहीम तीव्र केली आहे. नेरूळमध्ये दोन ठिकाणी छापा टाकून ४११ किलो प्लॅस्टिक जप्त करून पालिकेच्या ताब्यात दिले आहे. ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेसह प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही संयुक्त मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत एपीएमसी, वाशीमधील मॉल व इतर ठिकाणी छापा टाकून लाखो रुपयांचा माल जप्त केला आहे. गुरुवारी सायन- पनवेल महामार्गालगत नेरूळमध्ये दोन ठिकाणी छापे टाकले. येथील बिकानेर स्वीट या दुकानामध्ये ११ किलो प्लॅस्टिकच्या पिशव्या आढळल्या. याच परिसरातील रिलायन्स मार्ट या मॉलमध्ये तब्बल ४०० किलो प्लॅस्टिकचा साठा आढळून आला आहे. दोन्ही ठिकाणचे प्लॅस्टिक जप्त करून ते महापालिकेच्या ताब्यात दिले आहे. व्यापारी व नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर करू नये.वापर सुरूच ठेवला तर संबंधितांवर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.
या कारवाईच्या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. अनंत हर्षवर्धन, उपप्रादेशिक अधिकारी व्ही. व्ही. किल्लेदार, क्षेत्र अधिकारी इंद्रजीत देशमुख, केतन पाटील, उल्हास कानडे उपस्थित होते.