महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेतून ५३ हजार विद्यार्थ्यांना ४२ कोटींचे वाटप
By योगेश पिंगळे | Published: August 23, 2023 03:58 PM2023-08-23T15:58:07+5:302023-08-23T15:58:41+5:30
यंदा २०२१ -२२ आणि २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील अर्ज मागविण्यात आले होते.
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यंदा २०२१ -२२ आणि २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील अर्ज मागविण्यात आले होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या अर्जातून सुमारे ५३ हजार १३८ लाभार्थ्यांना सुमारे ४२ कोटी ३४ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अद्यापही १५ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज तपासणी प्रकियेत शिल्लक आहेत.
नवी मुंबई शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना देखील शिक्षण घेता यावे यासाठी महापालिकेचा समाजविकास विभाग, महिला व बालकल्याण, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती तसेच विद्यार्थी व युवक कल्याण समितीमार्फत शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. शहरातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील मुले, मागासवर्गीय घटकातील मुले, विधवा, घटस्फोटित महिलांची मुले, दगडखाण बांधकाम करणाऱ्या कामगारांची मुले, नवी मुंबई शहरातील प्रकल्पग्रस्त कुटुंबातील मुले, महापालिका आस्थापनेवरील आणि कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची मुले या सर्व घटकातील पहिली ते पदवी आणि त्यानंतर तांत्रिक, व्यवसाय प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेण्यापासून वंचित राहतात.
शिक्षण घेता येत नसल्याने त्यांचा विकास आणि कुटुंबाची उन्नती खुंटते. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगती आणि गुणवत्ता वाढीस मदत व्हावी या अनुषंगाने शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. यंदा २०२१ -२२ आणि २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील अर्ज मागविण्यात आले होते. दोन्ही वर्षाच्या योजेनसाठी सुमारे ७२ हजार ४९६ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते. यापैकी ५३ हजार १३८ पात्र लाभार्थ्यांना या योजेनचा लाभ मिळाला असून यासाठी महापालिकेने सुमारे ४२ कोटी ३४ लाख ८४ हजार २१९ रुपयांचे लाभार्थ्यांना वाटप केले आहे. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्याने अद्याप १५ हजार ९९१ लाभार्थ्यांचे अर्ज तपासणी प्रकियेत आहेत.