एनआरआय संकुलाला बाप्पा पावला; सिडकोने दिला ४२ लाख देखभाल-दुरुस्ती खर्च; १२ वर्षांनंतर मिळाला न्याय
By नारायण जाधव | Published: August 29, 2023 05:21 PM2023-08-29T17:21:51+5:302023-08-29T17:22:57+5:30
सीवूड्स सोसायटीचे सिडकोकडे दोन कोटी रुपये थकीत असून, त्यापैकी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी ४२ लाख रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतील अनिवासी भारतीयांसाठी सिडकोने बांधलेल्या एनआरआय काॅम्प्लेक्स अर्थात सीवूड्स इस्टेट कॉ.ऑप.हौ. सोसायटीला सिडकोने तब्बल बारा वर्षांनंतर देखभाल-दुरुस्ती खर्चापोटी थकीत रकमेपैकी ४२ लाख रुपयांचा पहिला हप्ता अखेर दिला आहे. सीवूड्स सोसायटीचे सिडकोकडे दोन कोटी रुपये थकीत असून, त्यापैकी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवाच्या आधी ४२ लाख रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे.
सोसायटीच्या संचालक मंडळाचा गेल्या अनेक दिवसांपासून थकबाकी मिळण्यासाठी सिडकोकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र, सिडकोचे अधिकारी चालढकलपणा करीत असल्याने ते हतबल झाले होते. निधीअभावी उच्चभ्रूंच्या या सोसायटीतील अंतर्गत रस्त्यांसह इतर सुविधांची पुरती दैना झाली होती. यामुळे अखेर त्यांनी स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानुसार म्हात्रे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल दिग्गीकर यांच्या दालनात विविध प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन हा विषय निकाली काढला.
नेरूळ येथे सिडकोने खास अनिवासी भारतीयांसाठी सीवूड इस्टेट ही अत्याधुनिक वसाहत ९० च्या दशकांत बांधली होती. मात्र, तिला अनिवासी भारतियांनी फारसा प्रतिसाद न दिल्याने अखेर स्थानिकांसाठी ती खुली केली. यानंतर तिचा दुसरा टप्पा सीवूड्स येथील फेस- २, सेक्टर- ५४, ५६, ५८ येथे विकसित केला. या सोसायटीत अनेक उच्चपदस्थ अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक राहतात. सिडकोचे अनेक अधिकारी तिथे वास्तव्याला आहेत. मात्र, गेल्या १२ वर्षांपासून सिडकोने देखभाल-दुरुस्ती खर्चापोटी एक छदामही दिला नव्हता. अखेर आता ४२ लाखांचा पहिला हप्ता मिळाल्याने सोसायटीचे ॲड. सुहास वेखंडे, चेअरमन रंजन घोसाल, दीपक येवले व इतर सदस्यांनी म्हात्रे यांचे आभार मानले आहेत.