नैराश्यातून अटलसेतूवरुन ४३ वर्षीय डॉक्टर महिलेची उडी; सेतूवरील पहिलीच घटना, पोलिसांचे शोधकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 02:44 PM2024-03-20T14:44:12+5:302024-03-20T14:44:12+5:30
मुंबई भोईवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत डॉक्टर किंजल शहा (४३) राहात आहेत.
मधुकर ठाकूर -
उरण : निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मुंबईतील एका ४३ वर्षीय डॉक्टर महिलेने अटल सेतूवरुन सोमवारी उडी घेतली आहे.या महिलेचा न्हावा -शेवा पोलिस समुद्र परिसरात शोध घेत आहेत.
मुंबई भोईवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत डॉक्टर किंजल शहा (४३) राहात आहेत. बऱ्याच दिवसांपासून त्या निराशेच्या तणावाखाली होत्या. सोमवारी घरातुन निघताना किंजल या आपण अटलसेतुवरुन आत्महत्या करीत असल्याची लिहिलेली चिठ्ठी घरात ठेवून घराबाहेर पडल्या होत्या. पावणे दोन वाजताच्या सुमारास त्या दादर येथुन खासगी टॅक्सीने अटलसेतुवर पोहचल्या होत्या. त्यानंतर अटल सेतु वरील बॅरिकेड्सचे काम सुरू असलेल्या ठिकाणी त्यांनी अटलसेतुवरुन समुद्रात उडी घेतली.या सर्व बाबी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर उघडकीस आल्या आहेत.अटलसेतुवरील आत्महत्येचा प्रयत्न करणारी ही पहिलीच घटना आहे.
किंजल यांची मिसिंगची तक्रार मुंबईतील भोईवाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. भोईवाडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष बोराटे यांनी न्हावा -शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना माहिती दिल्यानंतर संयुक्तरीत्या शोध कार्याला सुरुवात केली आहे.सागरी सुरक्षा दल, पोलिसांच्या गस्ती नौका यांच्या मदतीने पोलिस परिसरातील सागरी क्षेत्र, किनारपट्टी भागात शोध घेत असल्याची माहिती न्हावा -शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली.