भाजपच्या रोजगार मेळाव्यात ४४२ उमेदवारांना मिळाली नोकरी; नियुक्तिपत्रांचेही तत्काळ वाटप
By कमलाकर कांबळे | Published: October 26, 2023 07:35 PM2023-10-26T19:35:17+5:302023-10-26T19:35:42+5:30
सानपाडा येथील सौराष्ट्र पटेल सभागृहात झालेल्या या मेळाव्याचे आमदार गणेश नाईक यांच्या उदघाटन करण्यात आले.
नवी मुंबई: भारतीय जनता पार्टी आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सानपाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यासाठी १,९१७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४४२ उमेदवारांना या मेळाव्यात नोकरी मिळाली आहे. या मेळाव्याला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातील सक्षम प्रोजेक्ट व अक्षय फाऊंडेशनचे सहकार्य लाभले होते.
सानपाडा येथील सौराष्ट्र पटेल सभागृहात झालेल्या या मेळाव्याचे आमदार गणेश नाईक यांच्या उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी मेळाव्याचे मुख्य आयोजक तसेच नवी मुंबई भाजपचे अध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. येत्या काळात नवी मुंबईत रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. नवी मुंबईत डेटा सेंटर उद्योगात केंद्र सरकार ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दृष्टिपथात आले आहे. या दोन्ही प्रकल्पांत मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी तरुणांनी स्वत:मध्ये आवश्यक कौशल्य निर्माण करावे, असे आवाहन गणेश नाईक यांनी याप्रसंगी केले.
जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आतापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यांचा आढावा घेतला. या वर्षीच्या महारोजगार मेळाव्यात ५०० विविध क्षेत्रातील कंपन्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८० कंपन्यांनी मेळाव्याच्या ठिकाणी स्टॅल उभारले उभारल्याची माहिती संदीप नाईक यांनी यावेळी दिली. माजी खासदार संजीव नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. दरम्यान, मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांना सुप्रसिद्ध मार्गदर्शक सुहास पाटील यांनी करिअरविषयक मार्गदर्शन केले. मुलाखतीची तयारी कशी करावी, मुलाखत कशी द्यावी, याविषयी टिप्स दिल्या. मेळाव्यात नोकरी मिळालेल्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तत्काळ नियुक्तिपत्रांचे वाटप करण्यात आले.