शहरातील ४४३ इमारती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 02:13 AM2019-06-14T02:13:53+5:302019-06-14T02:14:05+5:30
धोकादायक इमारतींमधील १०६ बांधकामांचा सी-२ ए प्रवर्गामध्ये समावेश केला आहे.
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामधील ४४३ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. यामधील ७० इमारतींचा वापर बंद असून तब्बल ३७३ धोकादायक बांधकामांचा वापर सुरूच आहे. ५५ इमारती अतिधोकादायक असून, त्यामध्ये एपीएमसीच्या कांदा-बटाटा मार्केटचाही समावेश आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रत्येक वर्षी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करत असते. पावसामध्ये इमारती कोसळून जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली जाते. गतवर्षी ३६७ बांधकामे धोकादायक घोषित करण्यात आली होती. त्यामध्ये या वर्षी ७६ ची वाढ झाली आहे. धोकादायक बांधकामांचे चार प्रकार करण्यात आले आहेत. सी-१ मध्ये अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहे. शहरात अशाप्रकारच्या ५५ इमारती असून, त्यांचा वापर तत्काळ थांबविणे आवश्यक आहे. या इमारती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असून त्यामध्ये बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केटचाही समावेश आहे. दहा हजारांपेक्षा जास्त व्यापारी, कामगार व इतर घटकांचा वावर असलेले हे मार्केट एक दशकापूर्वीच धोकादायक घोषित केले आहे; परंतु पुनर्बांधणीचा वाद व स्थलांतरासाठी पुरेशी जागा नसल्याने मार्केटचा वापर बंद करण्यात आलेला नाही.
शेजारीच असलेल्या मॅफ्को मार्केटची इमारतही अतिधोकादायक असून, मूळ मार्केटचा वापर थांबविण्यात आला आहे. भाजीविक्रेत्यांना समोरील शेडमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाशीमधील जेएन टाइप इमारतींचाही अतिधोकादायक इमारतींमध्ये समावेश असून त्यामधील काही इमारतींचा वापर सुरूच आहे. नेरुळ सेक्टर ६ मधील दत्तगुरू गृहनिर्माण सोसायटीही अतिधोकादायक असून, नागरिकांनी तिचा वापर थांबविला आहे. नेरुळमध्ये धोकादायक ठरविण्यावरून वाद सुरू असलेल्या श्री गणेश गृहनिर्माण सोसायटीमधील काही इमारतींचाही अतिधोकादायकमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
धोकादायक इमारतींमधील १०६ बांधकामांचा सी-२ ए प्रवर्गामध्ये समावेश केला आहे. या इमारती खाली करून त्यांची संरचनात्मक दुरुस्ती करून घेणे आवश्यक आहे. सी-२ बी प्रवर्गात येणाऱ्या २२६ इमारती खाली न करता त्यांची दुरुस्ती करणे शक्य आहे. सी-३ प्रवर्गात येणाºया ५६ इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. राज्य शासनाने ५ नोव्हेंबर २०१५ मध्ये परिपत्रक काढले असून धोकादायक इमारतींचा वापर तत्काळ थांबवून त्या तोडून टाकण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेने या सर्व इमारतींना नोटीस दिली आहे. काही इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करण्याची नोटीसही देण्यात आली आहे. पालिकेच्या नोटीसनंतरही इमारतीचा वापर सुरूच राहिला व एखादी दुर्घटना घडली तर त्यास पालिका जबाबदार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मतभेदामुळे प्रश्न रखडले
अनेक गृहनिर्माण सोसायटीमध्ये इमारत धोकादायक ठरविण्यावरूनही मतभेद आहेत.
काही इमारती जाणीवपूर्वक अतिधोकादायकच्या यादीमध्ये टाकल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे.
काही ठिकाणी इमारतीच्या पुनर्बांधणीवरून दोन गट निर्माण झाले असल्यामुळे हा प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गंभीर होऊ लागला आहे.
एपीएमसीचा तिढा कायम
च्बाजार समितीचे कांदा-बटाटा मार्केटही अतिधोकादायकच्या यादीमध्ये आहे. एपीएमसी प्रशासनानेही १ जूनपासून मार्केटचा वापर थांबविण्याच्या नोटीस दिल्या होत्या; परंतु सक्षम पर्यायी व्यवस्था नसल्याने सद्यस्थितीमध्ये मार्केट आहे त्याच ठिकाणी सुरू आहे. याविषयी व्यापाऱ्यांनी न्यायालयातही धाव घेतली असून न्यायालयाच्या निर्णयानंतरच याविषयी ठोस उपाय होण्याची शक्यता आहे.
इमारती खाली करून जायचे कुठे?
च्धोकादायक इमारती तत्काळ खाली करण्याची नोटीस महापालिका प्रत्येक वर्षी देत आहे. नागरिकांना पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याच्या नोटीसही दिल्या जात आहेत; परंतु इमारती खाली करून जायचे कुठे असा प्रश्नही रहिवासी विचारू लागले आहेत. इमारती खाली करण्याचे सांगताना या प्रश्नावर उपायही सांगा, अशी प्रतिक्रिया नागरिक विचारू लागले आहेत.
पुनर्बांधणीचे प्रकल्प रखडले
च्धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी बांधकाम परवानगी मिळावी म्हणून पालिकेकडे अर्ज सादर करण्यात आले आहेत; परंतु अद्याप अडीच चटईक्षेत्राप्रमाणे पुनर्बांधणी करण्यास एकाही महत्त्वाच्या प्रकल्पास परवानगी दिलेली नाही. पुनर्बांधणीला परवानगी दिली जात नाही व दुसरीकडे घरे खाली करण्यास सांगितले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. ज्यांनी घरे खाली केली त्यांच्या इमारतींच्या पुनर्बांधणीलाही परवानगी मिळत नाही.
वर्षनिहाय धोकादायक इमारती
विभाग २०१५ - १६ २०१६ - १७ २०१७ - १८ २०१८ - १९ २०१९ - २०
बेलापूर ७ १ १५ १९ २९
नेरुळ २४ ४ - ४ ३
वाशी ११ ७० १०१ २ १
तुर्भे २ १४ ६ १९ १६
कोपरखैरणे ३ ५ २ १० २
घणसोली - २ - २ २४
ऐरोली २ - ४ १३ १
दिघा ६ १ १ २ -