पनवेल महापालिका क्षेत्रात ४५,७८६ जणांना लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:33 AM2021-04-22T00:33:20+5:302021-04-22T00:33:28+5:30
२ लाख १० हजार नागरिकांनी केली चाचणी
- वैभव गायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. नजीकच्या काळात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज किमान ६०० रुग्ण कोरोनाने बाधित होत आहेत. पालिका क्षेत्रातील अंदाजित लोकसंख्या दहा लाख असून, यापैकी २ लाख १० हजार २०० जणांनी कोरोनाची चाचणी केली आहे.
सध्याच्या घडीला ४३९६ कोरोना रुग्ण पालिका क्षेत्रात आहेत, तर सुमारे ४०,६४१ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनासारख्या आजारावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना तपासणी करणे गरजेचे आहे.
पालिकेने केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाच्या सर्वेक्षणानुसार पालिका क्षेत्राची लोकसंख्या किमान दहा लाख असल्याचे समजते. अद्याप झालेल्या चाचण्यांनुसार २ लाख १० हजार २०० जणांमध्ये ४५,७८६ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी ७४९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्ण बरे होण्याचा प्रमाण घटले आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८८.७६ टक्क्यांवर आली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण वाढविणे हाच एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे. त्यादृष्टीने लसीकरण वाढविणे गरजेचे आहे. अद्याप लसीकरणाचा एक लाखांचा आकडा पूर्ण झाला नसल्याने शासनाने पालिकेला जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मागील काही दिवसांपासून लसीचा वारंवार तुटवडा भासत असल्याने लसीकरणात खंड पडत आहे.
पनवेलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. शासकीय, खासगी रुग्णालये अपुरी पडू लागली असल्याने पालिका प्रशासनाने सुमारे ५०० जम्बो कोविड हॉस्पिटलचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. भविष्याची वाढती चिंता लक्षात घेता पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्वतःसह कुटुंबीयांची काळजी घेणे गरजेचे आहे.