याकूब बेग ट्रस्ट कार्यालयात ४७ लाखांची चोरी, तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 04:09 AM2018-01-14T04:09:27+5:302018-01-14T04:09:39+5:30
पनवेलमधील याकूब बेग ट्रस्टच्या कार्यालयातील सौदी अरेबिया देशाच्या रियालसह तब्बल ४६ लाख ७७ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून दीड लाख रुपये व एक कॅमेरा जप्त केला आहे.
पनवेल : पनवेलमधील याकूब बेग ट्रस्टच्या कार्यालयातील सौदी अरेबिया देशाच्या रियालसह तब्बल ४६ लाख ७७ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून दीड लाख रुपये व एक कॅमेरा जप्त केला आहे.
पनवेल तालुक्यात ट्रस्टच्या शेतजमिनी असून, त्या कुळांना शेती लावण्यासाठी दिलेल्या आहेत. त्याचे उत्पन्न म्हणून भाडे व खंड अशी रक्कम स्वरूपात येत असून, सदरची रक्कम ट्रस्टच्या कार्यालयात कॅशबॉक्समध्ये ठेवली जाते. अशा पद्धतीने याकूब बेग ट्रस्टला महिन्याअखेर साधारण चार ते पाच लाख रु पयांचे उत्पन्न येते. गत नोव्हेंबर महिन्यामध्ये ट्रस्टचे मुख्य विश्वस्त अलहाज म. मुस्तफा याकूब बेग यांनी ट्रस्टचे पोटरी अर्जुन राऊत यांच्याकडे चार लाख ७६ हजार रु पयांची रक्कम ठेवण्यासाठी दिली होती. त्या वेळी राऊत यांनी ट्रस्टच्या कार्यालयातील लोखंडी कपाटात कॅश बॉक्समध्ये सदरची रक्कम ठेवलेली होती. दरम्यानच्या काळात मुख्य ट्रस्टी हे परदेशात निघून गेल्याची संधी साधून एजाज हुसेन जलाल (५३), याने ट्रस्टच्या कार्यालयातील क्लार्क अफान अहमद शेख (३१) आणि चालक अकीब दिलावर पिंजारी (३३) या दोघांशी संगनमत करून कपाटातील चार लाख ७६ हजार रु पयांची रोख रक्कम, त्याचप्रमाणे मुख्य ट्रस्टी यांच्या कपाटातील ४२ लाख रुपयांच्या सौदी अरेबिया देशाच्या १० रियालच्या २० नोटा, अशी तब्बल ४६ लाख ७७ हजार रु पयांची चोरी केली. आपली चोरी पकडली जाऊ नये, यासाठी या तिघांनी ट्रस्टच्या कार्यालयात लावलेल्या सीसीटीव्हीच्या डीव्हीआरचीदेखील चोरी केली. गेल्या आठवड्यात परदेशात गेलेले ट्रस्टचे मुख्य विश्वस्त बेग परतल्यानंतर त्यांनी ट्रस्टच्या पोटरीकडे दिलेल्या रकमेची मागणी केली. त्यामुळे पोटरी राऊत यांनी कपाटात पैसे तपासले असता, ते चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. तसेच मुख्य विश्वस्तांच्या कपाटातील सौदी अरेबिया देशाची ४२ लाख रुपयांची रक्कमदेखील चोरीला गेल्याचे आढळून आले. ट्रस्टचे पोटरी राऊत यांनी पनवेल शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.