टास्कच्या बहाण्याने लुटणारे रॅकेट उघड; देशभरात ४७ जणांना गंडा

By सूर्यकांत वाघमारे | Published: December 1, 2023 05:21 PM2023-12-01T17:21:59+5:302023-12-01T17:23:24+5:30

आस्थापनांच्या नावे उघडायचे बँकेत खाते.

47 people were looted across the country exposed robbery racket under pretext of task | टास्कच्या बहाण्याने लुटणारे रॅकेट उघड; देशभरात ४७ जणांना गंडा

टास्कच्या बहाण्याने लुटणारे रॅकेट उघड; देशभरात ४७ जणांना गंडा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने अथवा इतर प्रकारे नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणारे रॅकेट सायबर पोलिसांनी उघड केले आहे. त्यामध्ये हाती लागलेले तिघेही सायबर गुन्हेगारांचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमधील अलवार भागातले आहेत. नेरुळच्या हावरे सेंच्युरियन मॉलमध्ये कॉलसेंटर चालवून देशभरात गुन्हे केले जात होते. त्यांच्या बँक खात्यातील ८५ लाख रुपये पोलिसांनी गोठवले आहेत. 

ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत असून त्यात लाखो रुपये क्षणात हडपले जात आहेत. त्यांच्याकडून नागरिकांना घरबसल्या थोड्याफार गुंतवणुकीतून भरभक्क्म नफ्याचे आमिष दाखवले जाते. त्यासाठी सुरवातीला एक ते दोन हजार रुपयांचा नफा देखील दिला जातो. त्याला भुलून अनेकजण अधिक नफ्यासाठी लाखो रुपये संबंधितांनी सांगितलेल्या खात्यावर पाठवतात. त्यानंतर मात्र गुंतवलेली रक्कम अथवा नफा न मिळाल्यास फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे करत असतात. मात्र तोपर्यंत संबंधितांनी गुन्हयासाठी वापरलेले मोबाईल नंबर, बँक खाती बंद केलेली असतात. अशाच प्रकारे नवी मुंबई सायबर पोलिसांकडे फसवणुकीची एक तक्रार आली होती. त्यामध्ये तक्रारदार यांची ३२ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक झाली होती. 

या गुन्ह्यासह इतर अशा गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी सहायक आयुक्त विशाल नेहूल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गजानन कदम, सहायक निरीक्षक राजू आलदर, उपनिरीक्षक रोहित बंडगर आदींचे पथक तपास करत होते. त्यामध्ये गुन्ह्यात वापरली गेलेली बँक खाती, मोबाईल नंबर यांचा तांत्रिक तपास सुरु असताना नेरूळच्या हावरे सेंच्युरियन मॉलमधील कॉल सेंटरचा उलगडा झाला. त्यानुसार सायबर सेलच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता तिघेजण हाती लागले. रणवीरसिंग नरपतसिंग कानावत (२८), अमरजित प्रकाश यादव (२१), जितेंद्र पूर्णचंद माडैय्या (२१) अशी त्यांची नावे आहेत. तिघेही राजस्थानमधील अलवर भागात राहणारे आहेत. त्यांनी भाईंदर, वाशी, बोरिवली तसेच नेरुळ व इतर ठिकाणी बनावट कॉलसेंटर थाटून अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. तर त्यांच्या टोळीत इतरही अनेकांचा समावेश असून त्यांचाही शोध सुरु असल्याचे उपायुक्त अमित काळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

वेगवेगळ्या उद्देशाने तात्पुरती आस्थापना सुरु करून गुमास्ता परवाना काढून त्याद्वारे छोट्या बँकांमध्ये खाते उघडले जायचे. त्यानंतर तिथले कार्यालय दुसरीकडे हलवून त्याठिकाणी कॉलसेंटर चालवले जायचे. त्यामुळे हे रॅकेट सहजरित्या पोलिसांच्या हाती लागत नव्हते. त्यांना बँकेत खाती उघडून देण्यात काही बँकांच्या कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Web Title: 47 people were looted across the country exposed robbery racket under pretext of task

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.