नवी मुंबई : शहराला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण मागील वर्षी पावसाळ्यात १०० टक्के भरले होते. धरणात सद्यस्थितीत ४७.20 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून हा पाणीसाठा केवळ १० ऑगस्ट पर्यंत पुरेल इतकाच आहे. यंदा पावसाळा लांबणीवर गेल्यास किंवा कमी पाऊस झाल्यास धरणातील पाणीसाठा पुरविण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर असेल अशा परिस्थितीत पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक असताना शहरात अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत असून याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
नवी मुंबई शहराला महापालिकेच्या मोरबे धरणात पाणीपुरवठा केला जातो. या धरणात ८८ मीटर उंचीपर्यंत पाण्याची साठवणूक करता येते. या धरणातील पाणी साठ्याची क्षमता १९०.८९ दशलक्ष घणमीटर इतकी असून दररोज ४८१ दशलक्ष लिटर पाणी नवी मुंबई महापालिका हद्दीमधील विविध नोड, एमआयडीसी क्षेत्र तसेच पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे, खारघर आदी भागात पाणीपुरवठा केला जातो. गेल्यावर्षी मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते.
पाणी वाटपासाठी महापालिकेच्या माध्यमातून योग्य नियोजन केले जात असल्याने शहरवासीयांची तहान वर्षभर भागते. सध्यस्थितीत धरणात सुमारे ४७.२० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून शहराच्या दैनंदिन पाण्याच्या गरजेनुसार उपलब्ध पाणीसाठा साधारण १० ऑगस्टपर्यंत पुरणार आहे. पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी अनेक ठिकाणी पाणी चोरीच्या घटना तसेच पाण्याचा होणारा अपव्यय रोखण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.