नवी मुंबईत दोन डेटा सेंटरमध्ये होणार ४७०३ कोटींची गुंतवणूक
By नारायण जाधव | Published: August 16, 2023 06:14 PM2023-08-16T18:14:39+5:302023-08-16T18:14:50+5:30
दिघा/महापे घेणार आकार : प्रदूषण नियंत्रण मंडळाची मंजुरी
नवी मुंबई : नवी मुंबईतील डेटा सेंटरची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शहरात आणखी दोन उद्योग समूहांचे डेटा सेंटर येत असून त्यात ४७०३ कोटी ५९ लाख रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. दोन्ही डेटा सेंटर शहरातील टीटीसी औद्याेगिक वसाहतीतच आकार घेणार आहेत.
यातील एक डेटा सेंटर दिघा येथे तर दुसरे महापेत बांधण्यात येणार आहे. यामुळे शहरांत आयटी उद्योगांत आणखी शेकडो रोजगार निर्माण होणार आहेत. दोन्ही प्रकल्पांना पर्यावरण विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती मिळाली आहे. यातील दिघा येथील डेटा सेंटर हे डेटा स्केप रिॲलिटी प्रा. लिमिटेड या कंपनीचे असून ते भूखंड क्रमांक १४/२, १५,३७ या सुमारे २६६१४ चौरस क्षेत्रावर ८४०८३ बांधकाम करण्यात येणार आहे. या ठिकाणी दोन ब्लॉकमध्ये तळमजला अधिक सात माळ्यांच्या दोन इमारती बांधण्यात येणार आहेत. एका ब्लॉकमध्ये १२ डेटा हॉल असणार आहेत. याठिकाणी कंपनी ३२११ कोटी ९० लाख रुपये गुंतवणूक करणार आहे.
दुसरे डेटा सेंटर महापे येथील भूखंड क्रमांक ई २०१,२०२ आणि २२९ वर कंट्रोल एस ही कंपनी आपल्या डेटा सेंटरचा विस्तार करणार आहे. या ठिकाणी ही कंपनी १४९१ कोटी ६९ लाख रुपयांची गुंतवणूक करणार आहे. येथे कंपनीने ३५ कोटी खर्चून १४५३३.७६ चौरस भूखंडावर ५३५०० चौरस मीटर बांधकाम करणार आहे. त्यासाठी कंपनीने पर्यावरण विभागाची परवानगीही घेतली होती. मात्र, अद्याप बांधकाम सुरू केलेले नव्हते. मात्र, कंपनीने या डाटा सेंटरचा विस्तार करण्याचा निर्णय घेऊन कंपनीने नव्याने ३५८२०.१९ चौरस मीटर क्षेत्रावर १,३६,७९७.१४ चौरस मीटर बांधकामाची परवानगी घेतली आहे. पाच वर्षांच्या आत बांधकाम करण्याची अट घालून प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीस ही परवानगी दिली आहे. या कंपनीचे हैदराबाद आणि चेन्नई येथे डेटा सेंटर कार्यरत आहेत.