पहिल्या टप्प्यात ४७२ कोटी खर्च करणार; एमएमआरडीएकडून प्रक्रिया सुरू
By नारायण जाधव | Published: October 20, 2022 05:20 PM2022-10-20T17:20:44+5:302022-10-20T17:21:04+5:30
ठाणे-भिवंडी कल्याण मेट्रोची कारशेड कशेळीतच
नवी मुंबई : ठाणे-भिवंडी कल्याण मेट्रो-५ ची कोन एमआयडीसीनजीकच्या गोवे येथील १६ हेक्टर जागेवरील कारशेड आता कशेळी येथे बांधण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, एमएमआरडीए पहिल्या टप्प्यात या कारशेडवर ४७२ कोटी रुपये खर्च करणार आहे.
स्थानिकांच्या विरोधानंतरही याबाबतचा प्रस्ताव एमएमआरडीएने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या सभेत मंजूर केला होता. त्यानंतर आता कशेळीतील कारशेडच्या प्रत्यक्ष बांधकामांसाठी एमएमआरडीएने एक पाऊल पुढे टाकून निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
मुंबईसह ठाणे, भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली या तीन शहरांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो-५ अंतर्गत विस्तारित २४.९ कि.मी.च्या मेट्रोमार्गाच्या डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवालासही अखेर राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर ऑक्टोबर २०१७ मध्ये राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पास मान्यता दिली होती. डापोलोनिया एसपीए आणि मेसर्स टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस या सल्लागारांनी तो तयार करून या मार्गासाठी त्यांनी सुमारे ८४१६ कोटी ५१ लाख इतका खर्च प्रस्तावित केला होता. मात्र, मार्गास विलंब झाल्याने त्यात मोठी वाढणार आहे.
भिवंडीत मार्ग भूमिगत केल्याने खर्चात १७२७ कोटींनी वाढ
कारण यापूर्वी भिवंडीत हा मार्ग भूमिगत केल्याने ७३५ बांधकामे वाचून प्रकल्पाचा खर्च १७२७ कोटींनी वाढला आहे. यामुळे प्रकल्प पूर्ण होईस्तोवर एकूण खर्चात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या कामांचा आहे समावेश-
एमएमआरडीएने कशेळी कारशेड बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी जागेवर भराव टाकून त्या ठिकाणी स्टेबलिंग यार्ड, प्रशासकीय इमारत, वर्कशॉप, रस्ते, पूल आणि कर्मचारी निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. यासाठी पर्यावरण परवानगीही घ्यावी लागणार आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्त यावर आता काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.