कंपन्यांनी थकविले ४८४ कोटी; जेएनपीटीच्या नोटिसांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 06:06 AM2018-05-21T06:06:32+5:302018-05-21T06:06:32+5:30
तेल, रासायनिक, शिपिंग कंपन्यांचा समावेश
उरण : नामांकित तेल, रासायनिक कंपन्या, सीएफएस, शिपिंग कंपन्या, एजंटांनी जेएनपीटीच्या पाणी, वीज, भुईभाडे आदी बिलापोटी ४८४ कोटींची रक्कम थकविली आहे. मागील काही वर्षांपासून सातत्याने नोटिसा पाठवूनही कोट्यवधींची थकबाकी भरण्यात बड्या भांडवलदार कंपन्या चालढकलपणा करीत असल्याची माहिती जेएनपीटीच्या अधिकृत सूत्रांनी दिली. जेएनपीटीच्या नरमाईच्या धोरणाबाबत कामगार वर्गातून मात्र संताप व्यक्त केला जात आहे.
जेएनपीटीने आपल्या मालकीच्या अनेक जमिनी तेल, रासायनिक, शिपिंग कंपन्या आणि एजंट, सीएफएसना १९९४ पासून भाड्याने दिल्या आहेत. तेल आणि रासायनिक कंपन्यांनी तर जेएनपीटी परिसरात मोठमोठे टँकफार्म उभारले आहेत. भाडेतत्त्वावर दिलेल्या भाडेकरूंना जेएनपीटी पाणी, वीज आणि देखभालीचाही खर्च करते. मात्र भाडेकरू कंपन्या जेएनपीटीला भाडे देण्यास चालढकलपणा करीत आहेत. त्यामुळे परिसरातील १२ तेल, रासायनिक कंपन्यांकडेच जेएनपीटीची १६ मे २०१८ अखेर ४२९ कोटी २८ लाख ७५ हजार ७०४ रुपयांची तर, शिपिंग कंपन्या आणि एजंट, सीएफएसनी घरभाड्यापोटीची ५५ कोटी अशी एकूण ४८४ क ोटींची रक्कम थकविली आहे.
१२ बड्या भांडवलदारांच्या तेल आणि रासायनिक कंपन्यांबरोबर केंद्र, राज्य सरकारच्या काही शासकीय विभागांचाही समावेश आहे. यापैकी थकबाकीदार तेल आणि रासायनिक कंपन्यांचा भाडेपट्टीचा करार मागील साडेचार वर्षांपूर्वीच संपुष्टात आला आहे. मात्र तरीही थकबाकीदार कंपन्या भाड्याने दिलेल्या जमिनीच्या क्षेत्रापेक्षा अधिक पटीने जमिनीचा वापर करून कोट्यवधीचा नफा कमवित आहेत. मात्र जेएनपीटीच्याच जमिनीच्याच जमिनीवर कोट्यवधीचा नफा कमाविणाऱ्या तेल व रासायनिक कंपन्या थकीत रकमेचा भरणा करण्यास तयार नाहीत. जेएनपीटीने वारंवार नोटीस, मागणीनंतरही थकीत रकमेचा भरणा क रण्यास तेल, रासायनिक कंपन्या टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे बड्या भांडवलदार कंपन्या जेएनपीटीला जुमानत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. महसूल बुडव्या भांडवलदार कंपन्यांना केंद्र, राज्यातील मंत्री, राजकीय पुढारी, नेत्यांचा वरदहस्त असल्यानेच जेएनपीटीला जुमानत नसल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे. कामगारांकडून एक रुपयाची वसुलीही वेतनातून कापून जेएनपीटी करते. मात्र मोठ्या थकबाकीदार कंपन्यांकडे जेएनपीटी अधिकारी का दुर्लक्ष करतात, असा प्रश्न कामगारांना पडला आहे. जेएनपीटी तेल, रासायनिक कंपन्याबरोबरच विविध कंटेनर यार्ड, कार्यालये, गाळे, दुकाने, निवासस्थानेही छोट्या-मोठ्या शिपिंग कंपन्या आणि एजंटांना भाड्याने दिल्या आहेत. त्यांच्याकडेही सुमारे ५५ कोटींची रक्कम थकीत असल्याची माहिती जेएनपीटी अधिकृत सूत्रांनी दिली. त्यामुळे जेएनपीटीच्या थकीत रकमेचा आकडा ४८५ कोटीपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे थकीत रकमेचा भरणा केल्याशिवाय तेल, रासायनिक कंपन्या आणि कंटेनर यार्ड यांच्यातील भाडेपट्टीचा करार केला जाणार नसल्याचा निर्णय जेएनपीटी बोर्ड आॅफ ट्रस्टींच्या बैठकीत याआधीच घेतला असल्याची माहितीही जेएनपीटी सूत्रांनी दिली. मात्र थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाºया काही कंपन्यांनी जेएनपीटी भुईभाडे जादा दराने आकारणी करत असल्याची तकलादू कारणे पुढे करत न्यायालयाचेही दरवाजे ठोठावले आहेत. कोट्यवधींचा महसूल थकविण्यामागे मोठा घोटाळा असून या आर्थिक घोटाळ्यामध्ये अनेक मोठी मंडळी असण्याचा संशय काही अधिकारी आणि कामगारांकडून व्यक्त केला जात आहे.
वसुलीविरोधात न्यायालयात दाद
१टँकफार्म आणि रासायनिक कंपन्यांकडे असलेल्या थकबाकीच्या वसुलीचे कारण आरबी ट्रेकर यांनी थकबाकीदारांना त्यांची बाजू मांडण्याचेही आदेश दिले आहेत. मात्र अनेक थकबाकीदारांनी आपली बाजू मांडण्यासाठीही चालढकलपणा चालविलेला आहे, तर काही थकबाकीदारांना जेएनपीटी करीत असलेली वसुली अन्यायकारक वाटत असल्याने त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत लागल्या आहेत.
२आरबी ट्रेकरने जेएनपीटी आणि थकबाकीदार कंपन्यांनी आपआपसात परस्पर चर्चा करून तोडगा काढण्याचे सुचविण्यात आले आहे. मात्र यासाठीही काही थकबाकीदार कंपन्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. तरी थकबाकी वसुलीसाठी सर्वच उपाययोजना जेएनपीटीकडून केल्या जातील, अशी प्रतिक्रिया जेएनपीटी प्रभारी चेअरमन नीरज बन्सल यांनी दिली.
३रासायनिक कंपन्यांकडे असलेली कोट्यवधीची थकबाकी जेएनपीटीने वसूल करावी. थकबाकी भरल्याशिवाय थकबाकी असलेल्या कंपन्यांना यापुढे जागा भुईभाड्याने देण्यासाठी त्यांचा समावेश करू नका, अशी मागणी नोव्हेंबर महिन्यातच केली असल्याची माहिती जेएनपीटीचे कामगार ट्रस्टी रवींद्र पाटील यांनी केली आहे.
जेएनपीटीतील थकबाकीदार तेल, रासायनिक व शिपिंग कंपन्या
कंपनी युनिट थकबाकी
भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. ३५ ३१०६८१७५
शेल इंडिया मार्केट्स प्रा. लि. ३५ २७१८३५९३
दीपक फर्टिलायझर कार्पो. लि. ३५ २१९२७८५६१
मे. गणेश बॅन्जोप्लास्ट लि. ३५ ११२०३१६२५७
हिंदुस्थान आॅर्गेनिक केमिकल्स लि. ३५ १९८०९७६७६
आयएमसी लिमिटेड ३५ ४११००३१७१
इंडियन आॅइल कार्पोरेशन लि. फे ज १ १००६५२०६५३
आयओटीएल इन्फ्रास्ट्रक्चर अँड एनर्जी सर्व्हिसेस लि. ३५ १३०५७८८४३
कंपनी युनिट थकबाकी
आॅइल अँड नॅचरल गॅस कार्पोरेशन लि. ३५ १९१२२८२६२
रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर्स लि. फेज १ ४२७८७७१३
सूरज अॅग्रो प्रोडक्टर्स प्रा. लि. ३५ २००५२१४१
भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. ३६ ७३६७२२६०
मे. गणेश बॅन्जोप्लास्ट लि. ३६ १५३१८७७७१
आयएमसी लिमिटेड ३६ २२२२३२०५३
भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि.(एलपीजी) ३६ ३३१२६७७०
रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर्स लि. ३६ ४१२५४१८०२