नवी मुंबईसह पनवेलमधील २९ दहीहंड्या रद्द; पोलीस आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:28 PM2019-08-23T23:28:17+5:302019-08-23T23:28:25+5:30
हंड्या रद्द करून त्याद्वारे बचत होणारी रक्कम पूरग्रस्तांना मदतनिधी म्हणून देण्याचा निर्णय संबंधित मंडळांकडून घेण्यात आला आहे.
नवी मुंबई : कोल्हापूर, सांगली येथे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीच्या निमित्ताने नवी मुंबईसह पनवेलमधील २९ हंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या हंड्या रद्द करून त्याद्वारे बचत होणारी रक्कम पूरग्रस्तांना मदतनिधी म्हणून देण्याचा निर्णय संबंधित मंडळांकडून घेण्यात आला आहे. या भूमिकेचे पोलीस आयुक्तांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्टÑात आलेल्या पुरामुळे अनेकांवर मोठे संकट कोसळले आहे. या पुरामुळे सांगली, कोल्हापूर येथील अनेक गावांमधील नागरिकांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. तर अनेकांच्या घरांचे पूर्णपणे नुकसान झाले असल्याने त्यांच्यापुढेही आव्हाने निर्माण झाली आहेत. अशावेळी राज्यभरातून त्यांना मदतीचा हात मिळत होता. त्यानुसार नवी मुंबईतील दहीहंडी आयोजक व गणेशोत्सव मंडळांनीही त्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी गत आठवड्यात वाशीत झालेल्या विघ्नहर्ता पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी केले होते. त्यानुसार पनवेल, नवी मुंबईतील नियोजित ९० दहीहंड्यांपैकी २९ हंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात अनेक मानाच्या हंड्यांसह इतरही हंड्यांचा समावेश आहे. त्यापैकी अनेक मंडळांनी हंडी रद्द केल्याने बचत होणारा निधी पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे, तर काहींकडून आवश्यक वस्तू व साहित्यांचे वाटप केले जाणार आहे. यामधून नवी मुंबईकरांमधील सामाजिक बांधिलकी व एकोप्याचे दर्शन घडत असल्याची भावना पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार हंड्या रद्द करून खर्चाला आवर घालून पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेणाऱ्या मंडळांचे त्यांनी अभिनंदन देखील केले आहे.