नवी मुंबई : चरस विक्रीसाठी आलेल्या एकाला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५ लाख १० हजार रुपये किमतीचे चरस हस्तगत करण्यात आले आहे. एमआयडीसी परिसरात तो चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून हि कारवाई केली आहे.
तुर्भे एमआयडीसी परिसरात एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी निरीक्षक संजय जोशी, सहायक निरीक्षक निलेश येवले यांचे पथक केले होते. या पथकाने गुरुवारी एच.पी. कंपनीकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला होता. त्याठिकाणी दुचाकीवरून आलेल्या एकावर पथकाला संशय येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्याकडे १ किलो ३१८ ग्रॅम चरस आढळून आले. बाजारभावानुसार त्याची किंमत ५ लाख १० हजार रुपये आहे. याप्रकरणी संजीव प्रकाश पाटील (३२) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तो नेरूळच्या बांचोली परिसरात राहणारा असून टेम्पो चालक आहे. हे चरस घेऊन त्याठिकाणी तो विक्रीसाठी आला होता. त्याने हे ड्रग्स कुठून आणले याचा अधिक तपास तुर्भे एमआयडीसी पोलिस करत आहेत.