सात वर्षांत ५ लाख घरे
By admin | Published: October 14, 2015 04:11 AM2015-10-14T04:11:32+5:302015-10-14T04:11:32+5:30
घरांच्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांची परवड होत असल्याने पुढील सात वर्षांत अल्प आणि दुर्बल गटांसाठी तब्बल पाच लाख घरे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सिडकोने घेतला आहे.
नवी मुंबई : घरांच्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांची परवड होत असल्याने पुढील सात वर्षांत अल्प आणि दुर्बल गटांसाठी तब्बल पाच लाख घरे बांधण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सिडकोने घेतला आहे.
सायबर सिटीत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात खासगी विकासकांनी छोट्या आकाराची घरे बांधणे बंद केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची परवड होत आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने पुन्हा गृहबांधणीच्या आपल्या मूळ धोरणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार मागील साडेतीन वर्षांत शहराच्या विविध भागांत विविध घटकांसाठी पावणेनऊ हजार घरे बांधली आहेत. त्यापैकी अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी साडेचार हजार घरे आहेत. गेल्या वर्षी खारघर येथील स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील घरांवर सर्वसामान्यांच्या उड्या पडल्या होत्या. पाच लाख घरे बांधण्याच्या दृष्टीने प्राथमिक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. गृहप्रकल्पासाठी संभाव्य जागांची निवड, गृहप्रकल्पांचे स्वरूप, त्यातील घरांची रचना, सोयीसुविधांचा आराखडा याबाबत चाचपणी सुरू करण्यात आली असून, लवकरच घरे बांधण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात येईल, अशी माहिती सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी दिली. शासनाच्या धोरणानुसार ही घरे स्वस्त असणार आहेत. त्यानुसार या घरांची विक्री करताना सिडको ग्राहकांकडून जमिनीचे शुल्क घेणार नसल्याने ती अधिक स्वस्त दरात उपलब्ध करणे शक्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)