शिशुवर्गाच्या शुल्कात ५० टक्के वाढ
By admin | Published: March 30, 2016 01:52 AM2016-03-30T01:52:07+5:302016-03-30T01:52:07+5:30
कळंबोलीतील कारमेल शाळेतील केजीच्या शुल्कात ५० टक्क्याने वाढ करण्यात आल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी ही वाढ
पनवेल : कळंबोलीतील कारमेल शाळेतील केजीच्या शुल्कात ५० टक्क्याने वाढ करण्यात आल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी ही वाढ करण्यात आल्याने कारण शाळा व्यवस्थापनाने दिले आहे.
कळंबोलीत कारमेल कॉन्व्हेंटमध्ये नर्सरी ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते. शाळेत वेरोनिका नावाने पूर्व प्राथमिक शाळा चालविण्यात येते. नर्सरीला प्रवेश घेतला तरच विद्यार्थ्याला प्राथमिक शाळेत प्रवेश मिळतो. त्यामुळे पालक नर्सरीलाच पाल्यांचा शाळेत प्रवेश घेतात. ठरावीक जागा आणि जास्त अर्ज त्यामुळे कित्येकांना प्रवेश मिळत सुध्दा नाही.
नर्सरीकरिता दरवर्षी शुल्क वाढवले जाते आणि तेही एकरकमी भरण्याची सक्ती केली जात असल्याचे पालकांची कुचंबणा होते. आगामी शैक्षणिक वर्षाकरिता शाळा व्यवस्थापनाने नर्सरी, ज्युनिअर आणि सिनीअर केजीच्या शुल्कात वाढ केली आहे. गेल्या वर्षी २३,५00 शुल्क होते त्यामध्ये १0 हजाराने वाढ करीत ती ३३ हजारवर नेण्यात आले आहे. तसे सूचनापत्र विद्यार्थ्यांमार्फत पालकांना पाठविण्यात आले होते. मात्र ही वाढ अन्यायकारक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
गेल्या तीन दिवसांपासून शाळा व्यवस्थापनाबरोबर चर्चा करण्याची मागणी पालक करीत आहेत, मात्र त्याकडेही व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे. (वार्ताहर)
कनिष्ठ महाविद्यालय सुरू करायचे आहे, इमारत निधी, शिक्षकांची वेतनवाढ यासाठी ही शुल्कवाढ करण्यात आली आहे. आमची संस्था खासगी असल्याने शासकीय अनुदान नाही त्यामुळे फीवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर पुस्तके, गणवेश बाहेरून घ्या, मात्र इतर फी कमी केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेचे विधानसभा संघटक दीपक निकम यांनी याबाबत गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांची संपर्क साधून पालकांसमवेत त्यांची भेट घेतली. यावेळी पालकांनी आपल्या व्यथा साबळे यांच्यासमोर मांडल्या. पूर्वप्राथमिक शाळांवरील शुल्क नियंत्रणासाठी शिक्षण विभागाकडून हालचाली सुरू आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयात संपर्क साधून याबाबत तोडगा काढण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांनी सुध्दा याबाबत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र जर शाळेने फीवाढ मागे घेतली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. ज्युनिअर कॉलेज आणि केजीचा संबंध काय असा सवाल सुध्दा उपस्थित करण्यात आला आहे.