नवी मुंबई : नेरूळ पोलिसांनी गांजा विक्रीच्या अड्ड्यावर गुरुवारी छापा टाकून वर्षातील सर्वात मोठा साठा जप्त केला आहे. ५० ते १०० किलोच्या दरम्यान गांजा सापडला असून एक वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. याचाच भाग म्हणून जून २०१६ मध्ये स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी पथकाची स्थापना केली आहे. याशिवाय सर्व पोलीस स्टेशनला अमली पदार्थांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाचे काम चांगले चालले असून पोलीस स्टेशनअंतर्गत कारवाईला गती येत नव्हती. नेरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत व त्यांच्या पथकाने परिसरामध्ये गांजा विक्रीसाठी येणार असून त्याचा साठा करून ठेवला असल्याची माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे गुरुवारी सापळा रचून पोलिसांनी त्या अड्ड्यावर छापा टाकला आहे. पोलिसांना गांजाचा सर्वात मोठा साठा सापडला आहे. रात्री उशिरापर्यंत गांजाची मोजणी सुरू केली होती. सायंकाळी सहापर्यंत ५० किलोपेक्षा जास्त गाजा सापडल्याचे स्पष्ट झाले होते. पूर्ण वजन १०० किलोपर्यंत किंवा त्याहीपेक्षा जास्त भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या कारवाईविषयी पूर्णपणे गुप्तता बाळगली असून या गुन्ह्यातील सर्व आरोपींना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नक्की किती गांजा जप्त केला व किती जणांना अटक केली याविषयी अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषदेमध्येच याविषयी माहिती देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.नवी मुंबईमध्ये आतापर्यंत तळोजामध्ये सर्वात जास्त ५ किलो गांजा हस्तगत करण्यात आला होता. जून २०१६ मध्ये ती कारवाई झाली होती. यानंतर आॅगस्टमध्ये तळोजामध्येच ८ किलो गांजा सापडला होता. सीबीडीमध्ये १ किलो, उरणमध्ये ३ किलो ६०० ग्रॅम, कोपरखैरणेमध्ये १ किलो ८०० ग्रॅम व दोन दिवसांपूर्वी एपीएमसीमधून २ किलो गांजा जप्त केला आहे. परंतु यापेक्षाही नेरूळमध्ये केलेली कारवाई मोठी असून पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होऊ लागले आहे.
५० किलोपेक्षा जास्त गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:27 AM