पनवेलमध्ये आरटीओकडून पन्नास रिक्षा जप्त, ७५ जणांवर दंडात्मक कारवाई'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:43 AM2018-01-17T01:43:06+5:302018-01-17T01:43:08+5:30
पनवेल आरटीओ कार्यालयाकडून तीनआसनी रिक्षांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये ५० रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत, तर ७५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली
कळंबोली : पनवेल आरटीओ कार्यालयाकडून तीनआसनी रिक्षांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये ५० रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत, तर ७५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही मोहीम सुरूच ठेवणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.
पनवेलसह सिडको वसाहतीत व्यवसाय करताना अनेक रिक्षाचालकांकडून वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले जातात. मीटरप्रमाणे भाडे न आकारणे. गणवेश नसणे, परमिट, परवाना तसेच इतर कागदपत्रे नसताना रिक्षाचालक व्यवसाय करतात. त्यामुळे पनवेल आरटीओने सोमवार आणि मंगळवारी अशा रिक्षाचालकांविरोधात मोहीम हाती घेतली. आसुडगाव येथे नाकाबंदी करून रिक्षांची झाडाझडती घेण्यात आली. त्यामध्ये नोंदणी न करता रस्त्यावर धावणे, भाडे नाकारणे, मीटर डाउन न करणे, बॅच, परवाना नसताना व्यवसाय करणाºया रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. याआधी अशाच प्रकारे सहाआसनी रिक्षांविरोधात मोहीम राबविण्यात आली होती. प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांच्या सूचनेनुसार कारवाई केली आहे.