सिडको कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये दिवाळी बोनस
By कमलाकर कांबळे | Published: November 7, 2023 07:13 PM2023-11-07T19:13:03+5:302023-11-07T19:13:16+5:30
नवी मुंबई : राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळख असलेल्या सिडकोने यंदा आपल्या कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान अर्थात ...
नवी मुंबई : राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळख असलेल्या सिडकोने यंदा आपल्या कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान अर्थात दिवाळी बोनस जाहीर केला आहे. सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष विनोद पाटील आणि सरचिटणीस जे. टी. पाटील यांनी मंगळवारी द्वारसभा घेऊन व्यवस्थापनाच्या या निर्णयाची घोषणा केली.
कर्मचाऱ्यांच्या हक्क आणि हितासाठी सिडको एम्प्लॉईज युनियनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे हक्क आणि हितासाठी विविध स्तरावर पाठपुरावा केला जातो. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात प्रत्येक वर्षी वाढ केली जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बोनसच्या रकमेत वाढ केल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सिडकोतील प्रतिनियुक्ती धोरणाला युनियनचा सुरुवातीपासून विरोध असून, तो यापुढेही कायम राहील, अशी भूमिका विनोद पाटील यांनी यावेळी मांडली, तर अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार थकबाकी, कोविड कालावधीतील प्रलंबित कॅन्टीन कूपन भत्ता, कॅशलेस मेडिकल पॉलिसीमध्ये झालेली वाढ आदी निर्णयाबद्दल जे. टी. पाटील यांनी व्यवस्थापनाचे आभार मानले. त्याचप्रमाणे सिडको स्पोर्ट्स क्लब, सोसायटी भूखंड, १४३ वर्कचार्ज बेसिसवरील कर्मचाऱ्यांना सिडको आस्थापनेवर कायम करणे, अग्निशमन कर्मचाऱ्यांस आठ तास ड्युटी व अतिरिक्त भत्ते, सोसायटी भूखंड, बाह्यरुग्ण वैद्यकीय भत्त्यात वाढ, भरती, टाइम बॉन्ड प्रमोशन, शैक्षणिक भत्त्यात वाढ आदी निर्णयांची माहिती दिली. या सर्व निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावणारे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल आणि सह व्यवस्थापकीय संचालक कैलाश शिंदे यांचे युनियनने जाहीर आभार व्यक्त केले.