नवी मुंबई : तुर्भे येथील क्षेपणभूमीच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण पेटले आहे. क्षेपणभूमीच्या नव्या सेलला स्थानिक रहिवाशांसह लोकप्रतिनिधींकडून विरोध होत आहे. असे असले तरी या क्षेपणभूमीत शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. पर्यावरणाचे पुरेपूर संवर्धन केले जाते. कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, याची शास्त्रोक्त पद्धतीने काळजी घेतली जाते. एकूणच शहरातील घनकचऱ्याचे पुढील पन्नास वर्षांचे नियोजन तुर्भे येथील क्षेपणभूमीच्या माध्यमातून करण्यात आल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.तुर्भे येथे ६५ एकर जागेवर महापालिकेने अत्याधुनिक पध्दतीची क्षेपणभूमी तयार केली आहे. शहरात गोळा होणाऱ्या दैनंदिन घनकचऱ्यावर येथे प्रक्रिया केली जाते. या क्षेपणभूमीचे एकूण सात सेल तयार करण्यात आले आहेत. यापैकी चार सेलची क्षमता संपल्याने ते बंद करण्यात आले आहे. तर सध्या सुरू असलेला पाचवा सेल पुढील सहा महिन्यांपर्यंत वापरता येणार आहे. सहाव्या सेलची जागा ३.३७ एकर व सातव्या सेलची २.५ एकर इतकी आहे. या दोन्ही सेलमध्ये पुढील सात वर्षे घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे ठरावीक कालावधीनंतर बंद केलेल्या सेलचा पुनर्वापर करणे शक्य आहे. त्यामुळे आगामी काळात सेल क्रमांक १ ते ७ चा पुनर्वापर केल्यास पुढील पन्नास वर्षे शहरातील दैनंदिन घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न सुटणार आहे. (प्रतिनिधी)- घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला देशभरातील पर्यावरण तज्ज्ञ व संस्थांनी गौरविले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी या प्रकल्पाची प्रशंसा केली आहे. प्रकल्पामुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहचत नाही. २00५ ते २0१६ या अकरा वर्षांत घनकचरा व्यवस्थापनाचा एक आदर्श नमुना म्हणून हा प्रकल्प देशपातळीवर गौरविला गेला आहे. प्रकल्पाच्या पुढील लॅण्डफील सेलला विरोध करणे संयुक्तिक नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
घनकचरा व्यवस्थापनात पन्नास वर्षांचे नियोजन
By admin | Published: December 27, 2016 2:54 AM