अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल परिसराला मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा करण्याकरिता सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. शुक्रवारी शासनाच्या उच्चस्तरीय बैठकीत हिरवा कंदील दाखविण्यात आला. याअंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जुनाट झालेली जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. त्याचबरोबर समाविष्ट गावांमध्ये नव्याने जलवितरण व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे.जीवन प्राधिकरणाच्या भोकरपाडा येथील जवाहरलाल नेहरू जलशुद्धीकरण केंद्र ते जेएनपीटी व पनवेल या दरम्यान ३0 वर्षांपूर्वी ११५ एमएलडी क्षमतेची जलवाहिनी टाकण्यात आली होती, परंतु ही वाहिनी अतिशय जुनाट होऊन ठिकठिकाणी गंजली आहे. त्यामुळे पाण्याच्या दाबाने ती वारंवार फुटत आहेच. त्यामुळे दररोज लाखो लीटर पाण्याची गळती होत आहे. वाहिन्यांना पॅच मारण्याकरिता प्राधिकरणाकडून सातत्याने शटडाउन घेतला जात आहे. त्यामुळे पनवेलकर आणि सिडको वसाहतीतील रहिवाशांना तीन-चार दिवस पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे या वाहिन्या बदलण्याचा प्रस्ताव आहे, परंतु निधीअभावी हे काम होत नव्हते. महापालिकेकडे १९६ कोटी रुपयांची मागणी केली जात होती, परंतु मालकी एमजेपीची असताना मनपाने का पैसे द्यायचे असा सवाल मनपा प्रशासनाने केला. तसेच २0११च्या जनगणनेनुसार महापालिका हद्दीतील लोकसंख्या पाच लाख आहे. मात्र तसे पाहिले गेले तर ही लोकवस्ती आठ लाखांपेक्षा जास्त असल्याची वस्तुस्थिती आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी मांडली. त्यानुसार शासनाने वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. त्यानुसार ३७६ कोटी रुपये खर्च करून एमजेपीची जलवाहिनी बदलण्याबरोबरच अंतर्गत जलवाहिन्या टाकण्याच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे.
अमृत जलयोजनेसाठी ५०० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 1:45 AM