नवी मुंबई : कष्टकरी शेतकऱ्यांना काशी विश्वेश्वराचे दर्शन घेता यावे यासाठी नवी मुंबई भाजीपाला वेल्फेअर असोसिएशनने बळीराजा निघाला काशीला हा उपक्रम सुरू केला आहे. सात वर्षामध्ये तब्बल ३५०० शेतकऱ्यांनी तिर्थयात्रेचा लाभ घेतला असून यावर्षीची १२ दिवसांची यात्रा रविवारपासून सुरू झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यापारी सोपानशेठ मेहेर यांनी पुढाकार घेवून शेतकऱ्यांसाठी ही यात्रा सुरू केली आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील वृद्ध शेतकऱ्यांची या यात्रेसाठी निवड केली जाते. वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना अनेकवेळा इच्छा असूनही तिर्थयात्रेला जाता येत नाही. यामुळे शेतीची कामे संपत आली की थोडासा निवांतपणा असलेल्या वेळी या यात्रेचे आयोजन करण्यास सुरवात झाली आहे. एपीएमसी मार्केटमध्ये सर्व व्यापारी यात्रेकरूंना शुभेच्छा देत असतात. यावर्षी निवड झालेल्या शेतकऱ्यांना रविवारी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात शुभेच्छा देण्यात आल्या. काशी यात्रेचे स्वप्न पुर्ण होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना होती. १२ दिवसांच्या यात्रेमध्ये शेतकऱ्यांना सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी स्वयंसेवकांची टिमही सोबत असते. काशी यात्रेचा प्रवास १२ दिवसांचा असल्याने व हिवाळा असल्याने सर्व जेष्ठ नागरीकांना उनी टोप्याही देण्यात आल्या आहेत. शिवाजी टर्मीनल्स वरून महानगरी एक्सप्रेसने सर्व शेतकऱ्यानी आयोध्येकडे रवाना होणार आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार नरेंद्र पाटील, प्रकाश बावीस्कर व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राज्यातील ५०० शेतकरी निघाले काशीयात्रेला
By admin | Published: January 23, 2017 5:52 AM