गावठाणात दिल्या पाच हजार नव्या नळजोडणी, तर झोपडपट्टीत २५,५१० स्टँड पोस्ट; नवी मुंबई महापालिकेची कामगिरी
By नारायण जाधव | Published: February 26, 2024 06:34 PM2024-02-26T18:34:34+5:302024-02-26T18:35:11+5:30
याशिवाय झोपडपट्टी भागात २०११ पर्यंतच्या संरक्षित झोपड्यांनासुद्धा ‘मागेल त्याला नळजोडणी’ देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असून, यामुळे १३६४ वैयक्तिक नळजोडणींच्या संख्येत वाढ झाली आहे.
नवी मुंबई : हर घर पाणी या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या क्षेत्रातील गावठाणांमध्ये बांधलेल्या सर्व सदनिकांमध्ये पाणी देयके देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यानुसार आतापर्यंत पाच हजार नवीन नळ जोडणी दिल्यामुळे पाणी देयकांच्या उत्पन्नामध्ये पाच कोटी ४१ लाख रुपये कोटी इतकी वाढ झाली आहे.
याशिवाय झोपडपट्टी भागात २०११ पर्यंतच्या संरक्षित झोपड्यांनासुद्धा ‘मागेल त्याला नळजोडणी’ देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असून, यामुळे १३६४ वैयक्तिक नळजोडणींच्या संख्येत वाढ झाली आहे. शिवाय मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २०११ नंतर अस्तित्वात आलेल्या निवासी झोपडपट्ट्यांतील पाच झोपड्यांच्या समूहास जलमापकासह साधारणत: २५,५१० सामायिक जलजोडणी उभा नळखांब (Standpost) दिलेल्या आहेत.