खारघरमध्ये होणार प्रदूषणरुपी ५१ फुटांच्या रावणाचं दहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 12:50 PM2020-10-25T12:50:41+5:302020-10-25T12:53:41+5:30
प्रदूषणाकडे लक्ष वेधण्याचा खारघर फोरमचा प्रयत्न
- वैभव गायकर
पनवेल- तळोजा औद्योगिक वसाहती मधून रात्रीच्या वेळी हवेत सोडणाऱ्या प्रदूषण विषयी शासनाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याने खारघर फोरमच्या वतीने आज दसऱ्याच्या दिवशी खारघर सेक्टर १५ घरकुल शेजारील मोकळ्या मैदानात ५१ फूट प्रदूषण रावण दहन केले जाणार आहे.
संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.तळोजा औद्योगिक वसाहती मधून रात्रीच्या वेळी सोडणाऱ्या वायू प्रदूषण मुळे खारघर, कामोठा, कळंबोली, रोडपाली, तळोजा ,पनवेल आदी परिसरातील नागरिक त्रस्त आहे.रात्रीच्या वेळी खिडक्या बंद करून झोपावे लागत आहे. पहाटेच्या वेळी मॉर्निंगओक साठी घराबाहेर पडल्या नंतर रासायनिक वायू मिश्रित दुर्गंधी मुळे श्वास घेताना त्रास होत असल्याचे निदर्शनास येताच खारघर, कामोठा, कळंबोली, रोडपाली, तळोजा खांदेश्वर परिसरातील विविध 20 पेक्षा जास्त संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच खारघरमध्ये पार पडली.
या बैठकीत तळोजा औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या प्रदूषण विषयी, प्रदूषण नियंत्रण महामंडळकडे लेखी तक्रार करूनही योग्य दखल घेतली जात नाही. एकीकडे काही कंपन्या बंद केल्याचे सांगतात.मात्र प्रदूषण कमी होताना दिसत नाही. दसरा होताच प्रदूषण विरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी दसऱ्याचा दिवशी प्रदूषण रावण दहन केले जाणार असल्याची माहिती नगरसेविका व फोरमच्या अध्यक्षा लीना अर्जुन गरड यांनी दिली.या प्रदूषण दहन कार्यक्रमात पनवेल परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गरड यांनी केले आहे.