कोरोनातही ५४० कोटी मालमत्ता कर जमा, नवी मुंबईत अभय योजनेचा १९,८९१ जणांनी घेतला लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 02:51 AM2021-04-02T02:51:24+5:302021-04-02T02:51:47+5:30

NMMC News : कोरोनामुळे वर्षभरात शहरवासीयांची आर्थिक घडी विस्कटलेली असतानाही पालिका प्रशासन ४५० कोटी मालमत्ता कर संकलित करण्यात यशस्वी झाली आहे.

540 crore property tax collected in Corona too, 19,891 people benefited from Abhay Yojana in Navi Mumbai | कोरोनातही ५४० कोटी मालमत्ता कर जमा, नवी मुंबईत अभय योजनेचा १९,८९१ जणांनी घेतला लाभ

कोरोनातही ५४० कोटी मालमत्ता कर जमा, नवी मुंबईत अभय योजनेचा १९,८९१ जणांनी घेतला लाभ

Next

नवी मुंबई : कोरोनामुळे वर्षभरात शहरवासीयांची आर्थिक घडी विस्कटलेली असतानाही पालिका प्रशासन ४५० कोटी मालमत्ता कर संकलित करण्यात यशस्वी झाली आहे. अभय याेजनेचा १९,८९१ जणांनी लाभ घेतला असून त्यांच्याकडून १५९ कोटी जमा झाले आहेत. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसात ४६ कोटी ४२ लक्ष रुपये वसूल झाले  आहेत.  

नवी मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी पालिका प्रशासन वर्षभर दिवसरात्र परिश्रम करत आहे. या कालावधीमध्ये मनपाच्या उत्पन्नावर परिणाम होऊ नये यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी वर्षभर नियमित आढावा घेऊन प्रशासनास योग्य त्या सूचना केल्या होत्या. नागरिकांनाही कर वेळेत भरण्याचे आवाहन केले होेते. एप्रिल ते डिसेंबरदरम्यान फक्त १४ कोटी रुपये वसूल झाले होते. यामुळे उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य होणार की नाही याविषयी शंका उपस्थित होत  होती.  

आयुक्तांनी मालमत्ता कर विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून पुढील तीन महिन्यांत जास्तीत जास्त कर वसूल करण्याचे निर्देश दिले. यामुळे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत तब्बल ४०० कोटीपेक्षा जास्त कर वसूल झाला. 

पालिकेने थकबाकी वसूलीसाठी १५ डिसेंबर ते १५ मार्चदरम्यान  अभय योजना जाहीर केली होती. या दरम्यान दंड रकमेमध्ये ७५ टक्के सवलत देण्यात आली होती. १६ मार्च ते ३१ मार्चदरम्यान दंड रकमेमध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली  होती.  

अभय योजनेमुळे १५९ कोटी कर वसूल झाला असून नागरिकांना ७८ कोटी ८६ लाख ६३ हजार ७५९ रुपये सवलत मिळाली आहे. वर्षअखेरीस तब्बल ४६ कोटी ४२ लाख ७९ हजार १८५ रुपये कर जमा झाला आहे. मालमत्ता करातून ५४० कोटी कर संकलित झाला आहे.  

अभय योजना बंद
महानगरपालिकेने कोरोनामुळे नागरिकांसाठी अभय योजना जाहीर केली होती. ३१ मार्चपासून ही योजना बंद करण्यात आली आहे. यापुढे थकबाकीदारांना व्याज व दंडाची सर्व रक्कम भरावी लागणार आहे. यानंतर मनपाच्यावतीने कोणालाही करामध्ये सवलत दिली जाणार नाही.

Web Title: 540 crore property tax collected in Corona too, 19,891 people benefited from Abhay Yojana in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.