पेण : जिल्हा परिषद गटाच्या ५ जागांसाठी १७ उमेदवार व पंचायत समितीच्या १० जागांसाठी ३२ उमेदवार असे एकूण ४९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून तब्बल १ लाख ३९ हजार एकूण मतदारांपैकी सायंकाळपर्यंत ७५ हजार ७८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी ५४.४५ इतकी असून उर्वरित मतदानाची वेळ संपेपर्यंत ६५ टक्के मतदान अपेक्षित आहे. प्रशासनामुळे पेणच्या रावे या अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर ड्रोन कॅमेरे तैनात ठेवून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी ११.३० वा. २२.०५ टक्के, दुपारी १.३० वा. ३९.०४ टक्के त्यानंतर दुपारी ४ वा. ५४.४५ टक्के मतदान झाले. जिल्हा परिषद गटाच्या जिते मतदारसंघात सायंकाळी ४ वाजेपर्यंत ८२४७ पुरुष, ८२९० स्त्रिया अशा एकूण १६,५३५ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ६०.६६ आहे. दादर गटात ८५७२ पुरुष, ९०१७ महिला मतदार मिळून एकूण १७,५८९ मतदारांनी मतदान केले. टक्केवारी ६१.०२ असून वडखळ गटात ६४७६ पुरुष तर ७०१५ स्त्रिया मतदार मिळून १३,४९१ मतदान झाले असून ४५.४० टक्के मतदान झाले. पाबळ गटात ७०७२ पुरुष, ६७६२ स्त्रिया मतदार मिळून एकूण १३,८३४ मतदारांचे ५५.४० टक्के मतदान झाले. काराव गटात पुरुष मतदार ७०६६ तर ७२६९ महिला मतदार मिळून एकूण १४,३३५ मतदान झाले. त्याची टक्केवारी ५०.८९ टक्के झाली. ३७ हजार ४३३ पुरुष व ३८ हजार ५५३ महिला मतदारांनी मिळून एकूण ७५ हजार ७८६ मतदारांनी आपला हक्क बजावला असून सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५४.४५ टक्के मतदान झाले. उर्वरित दीड तासाच्या वेळेपर्यंत ६५ टक्के मतदान होईल असा अंदाज असून सर्वत्र मतदान शांततेने पार पडले. निवडणूक आयोगाचे राज्य निरीक्षक, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर, जिल्हाधिकारी शीतल उगले, रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांची रावे केंद्राला भेट व कडक पोलीस बंदोबस्तामुळे पेणमध्ये शांततापूर्वक मतदान झाले. यासाठी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले व पेणच्या प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिमा कुदलवाड अभिनंदनास पात्र ठरल्या.
पेण तालुक्यात ५४.४५ टक्के मतदान
By admin | Published: February 22, 2017 6:52 AM