५५० कोटींचे यंत्र करणार कर्करोगाच्या पेशींचा नाश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 09:22 AM2022-01-22T09:22:27+5:302022-01-22T09:22:41+5:30
खारघरच्या टाटा रुग्णालयात १२ लाखांचे उपचार मिळणार मोफत
पनवेल : कर्करोगाच्या पेशींवर तत्काळ घाव घालण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या प्रोटॉन थेरपीला खारघरमधील टाटा रुग्णालय येथे सुरुवात होणार आहे. या प्रोटॉन थेरपीच्या दुसऱ्या उपचार कक्षाची प्रोटोकॉल चाचणी शुक्रवारी यशस्वी झाली. या मशिनची किंमत सुमारे ५५० कोटी एवढी आहे. अमेरिकेसारख्या देशात प्रोटॉन थेरपीच्या एकवेळेच्या उपचाराचा खर्च सुमारे १० ते १२ लाखाच्या घरात आहे. मात्र या रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत.
टाटा मेमोरियल सेंटर एक्ट्रेक्ट, आयबीए बेल्जियम यांनी कक्षाची यशस्वी चाचणी केली. यावेळी एक्ट्रेक्टचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, डॉ. सिद्धार्थ लस्कर, आयबीए इंडियाचे संचालक राकेश पाठक उपस्थित होते. टीएमसीमार्फत सुरू करण्यात येणारी प्रोटॉन थेरपी देशातील सार्वजनिक भागीद्वारे सुरू करण्यात आलेली ही पहिलीच अद्ययावत उपचार पद्धती आहे. एका वर्षात ८०० रुग्णांना या ठिकाणी थेरपी देण्याचा मानस रुग्णालय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. कॅन्सरवर वैद्यकीय उपचार करताना शरीरातील कर्ककारक नसलेल्या इतर पेशींना न मारता कॅन्सरसाठी कारणीभूत असलेल्या पेशींवर घाव घालण्यासाठी प्रोटॉन थेरपी उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी टाटा रुग्णालयाने सुरू केलेल्या खारघर येथील केंद्रामध्ये हेड्रॉन बीम थेरपी (प्रोटॉन) यंत्र आणण्यात आले आहे. हे यंत्र केवळ शरीरामध्ये असलेल्या कॅन्सरच्या पेशींचा नाश करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची बेल्जियममधील आयबीए कंपनीच्या माध्यमातून या मशीनची निर्मिती करण्यात आली.
एआयबीएचे भारतातील संचालक राकेश पाठक यांच्या टीमच्या माध्यमातून प्रोटॉन थेरपीची यंत्रणा बसविण्याचे काम मागील काही काळापासून खारघर टाटा एक्ट्रेक्ट सेंटरमध्ये सुरू आहे.
जगभरातील १२० देशात अद्ययावत उपचार पद्धती
जगातील केवळ १२० देशांमध्ये ही कर्करोगासाठी आधारित अद्ययावत उपचार पद्धती उपलब्ध आहे. सर्वसामान्य रुग्णांना विशेषतः लहान मुलांना या आधुनिक व प्रभावी उपचार पद्धतीचा लाभ होईल, असे आयबीएचे राकेश पाठक यांनी सांगितले. लवकरच संबंधित कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असल्याने रुग्णांना या अद्ययावत उपचार पद्धतीचा लाभ होणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.