553 पाळीव कुत्रे, मांजरांची नोंदणी, ॲंटीरेबीज लसही देण्यात आली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 07:41 PM2024-02-10T19:41:34+5:302024-02-10T19:41:56+5:30
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, कुत्रा आणि मांजर हे पाळीव प्राणी आता माणसाच्या कुटुंबातील सदस्य झालेले आहेत. महापालिकेने या प्राण्यांची नोंद घेऊन त्यांचे स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी कार्यक्रम आखणे खूप आवश्यक होते.
पनवेल : पनवेल महानगरपालिका व मिनिस्ट्री ऑफ पेट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार दि. 10 रोजी पाळीव श्वान व मांजर ॲंटीरेबीज लस, जंतनाशक आरोग्य तपासणी तसेच मोफत लसीकरण कार्यक्रम नवीन पनवेल येथे जागृती प्रकल्प सभागृहामध्ये घेण्यात आला. यावेळी 553 पाळीव कुत्रे आणि श्वानांची नोंदणी करण्यात आली.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान गीते, माजी नगरसेवक समीर ठाकूर, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, मिनिस्ट्री ऑफ पेट्सचे प्रवीण नावंधर, देवेश नावंधर उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, कुत्रा आणि मांजर हे पाळीव प्राणी आता माणसाच्या कुटुंबातील सदस्य झालेले आहेत. महापालिकेने या प्राण्यांची नोंद घेऊन त्यांचे स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी कार्यक्रम आखणे खूप आवश्यक होते. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून महापालिकेने पुढाकार घेऊन आपली जबाबदारी पार पडली आहे.
मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या कामाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच रेबीजचा प्रसार कमी करण्यासाठी महापालिकेच्यावतीने भटक्या कुत्र्यांसाठी येत्या 26 फेब्रुवारी ते 1 मार्च ॲंटी रेबीज कॅम्प दरम्यान राबविविल्या जाणाऱ्या मोहिमेची माहिती दिली. यावेळी विविध एनजीओचे प्रतिनिधी, पाळीव कुत्रा व मांजराचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.