उरणच्या ५५७ नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई घ्या प्रतिक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 12:11 PM2023-05-20T12:11:32+5:302023-05-20T12:21:32+5:30
नुकसान भरपाईची रक्कमेचा छदामही मिळाला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मधुकर ठाकूर
उरण : उरण परिसरात मागील वर्षापासून झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बागायती, जिरायती पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले असून ५५७ शेतकऱ्यांचे २४ लाख ७८ हजार ६१२ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.मात्र अद्यापही गतिमान-वेगवान सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कमेचा छदामही मिळाला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
उरण तालुक्यात भातपीक २४११ तर आंबा, काजू, चिकू, नारळ, शेवगा आदी बागायती पिके ७४.२९ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. मागील तीन वर्षांचा आढावा घेतला असता अवेळी पाऊस, अतिवृष्टी आदी कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे बागायती, जिरायती पिकांचे नुकसान झाले आहे.
वर्ष बाधीतांची संख्या बाधीत क्षेत्र आर्थिक नुकसान
ऑगस्ट २०२२. २४८. ५०.२२. ६८२९९२.
ऑक्टोंबर २०२२. ३०. ९.२७. १२५१४५.
मार्च २०२३. १८९. ३१.४५. ९००९७५.
-----------------------------------------------------------------
एकूण- ४६७. ९०९४. १७०९११२.
-----------------------------------------------------------------
यामध्ये मार्चनंतर झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आणखी आंबा, काजू, चिकू, नारळ, शेवगा आदी ९० बागायतीदारांची भर पडली आहे.या ९० बागायतदारांचे ७ लाख ६९ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.सर्व मिळून अतिवृष्टी आणि पुरामुळे बागायती, जिरायती पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले असून ५५७ शेतकऱ्यांचे २४ लाख ७८ हजार ६१२ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी उरण तहसील कार्यालयाकडे सोपविण्यात आली असल्याची माहिती उरण तालुका कृषी अधिकारी किसन शिगवण यांनी दिली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाशी पत्र व्यवहार सुरू आहे. शासनाच्या व्हेबपोर्टलवरही माहिती टाकण्यात आली आहे.यापुढे शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावरच नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार असल्याची माहिती उरण तहसीलदार उध्दव कदम यांनी दिली.
शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाईच्या रकमेची प्रतिक्षा आहे.मात्र अद्यापही नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसल्याचे शेतकरी लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.
मात्र गतिमान-वेगवान सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कमेचा छदामही मिळाला नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.