शहरात १० दिवसांत ५८ वृक्ष कोसळले; झाडांखाली वाहने उभी न करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 02:57 AM2019-07-05T02:57:33+5:302019-07-05T02:57:46+5:30
महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वृक्ष कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वृक्ष कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पाऊस पडलेल्या दहा दिवसांमध्ये तब्बल ५८ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील काही दिवसामध्येही गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी व शक्यतो झाडांखाली वाहने उभी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून वृक्ष कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शहरामध्ये महानगरपालिकेने रोडच्या दोन्ही बाजूंनी व दुभाजकांमध्ये वृक्ष लागवड केली आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही वृक्ष लावले आहेत. यामधील अनेक वृक्षांना तीस ते चाळीस वर्षे झाली आहेत. वृक्ष लागवड करताना आंबा, जांभूळ, वड, पिंपळ अशा देशी झाडांना पसंती दिली जात नाही. कमी वेळेत येणारे व फांद्यांचा जास्त विस्तार न होणाऱ्या विदेशी झाडांची लागवड करण्यास पसंती देण्यात आली. हे वृक्ष पावसाळ्यात तग धरून रहात नाहीत. पाऊस व वारा सुरू झाला की वृक्ष कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. नवी मुंबईमध्ये १३ जूनला पहिल्यांदा पाऊस पडला होता. २४ तासांमध्ये फक्त ४.७० मिमी एवढाच पाऊस पडला असला तरी त्या दिवशी ९ वृक्ष कोसळले. यामधील ४ नेरूळमधील होते. तेव्हापासून रोज वृक्ष कोसळण्याच्या घटना घडत आहेत. २८ जून व १ जुलैला प्रत्येकी ११ ठिकाणी अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत.
नेरूळ व वाशीमध्ये वृक्ष कोसळल्यामुळे दुचाकी व कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. या घटना प्रतिदिन घडत असल्यामुळे पावसाळा संपेपर्यंत अशा अपघातामुळे नागरिक गंभीर जखमी होण्याची किंवा जीव गमवावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी गृहनिर्माण सोसायटीच्या आवारामधील वृक्षांच्या धोकादायक ठरतील अशा फांद्या तोडल्या आहेत. रोडवरील फांद्या महापालिकेने तोडल्या आहेत. या कचºयाची समस्या गंभीर झाली आहे. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये रोज ५० ते ८० टन वृक्षांच्या फांद्यांचा कचरा उचलावा लागत होता. घनकचरा व्यवस्थापनाला जादा वाहने या कामासाठी उपलब्ध करून द्यावी लागली आहेत. धोकादायक फांद्या छाटल्यानंतरही वृक्ष कोसळण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. यामुळे महापालिकेने व लोकप्रतिनिधींनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे रोडवरच वाहने उभी केली जातात. वृक्ष कोसळल्यामुळे या वाहनांचेही नुकसान होवू लागले आहे. यामुळे नागरिकांनी त्यांची वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करावी व पादचाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
पनवेलमधील स्थितीही गंभीर
मुसळधार पावसामुळे वृक्ष कोसळण्याच्या घटना पनवेल महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्येही वाढल्या आहेत. खारघर, कळंबोली, व पनवेल परिसरामध्ये अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले आहेत. या घटनांमध्ये पार्र्किं ग केलेल्या काही गाड्यांचे नुकासान झाले आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी व वृक्षांखाली वाहने उभी करू नयेत, असे आवाहनही केले आहे. पावसाळा पूर्ण होईपर्यंत या घटना अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विजेचा धक्का बसण्याची भीती
पावसाळा सुरू झाल्यापासून आठ ठिकाणी आग व शॉर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरात अनेक ठिकाणी विद्युत डीपी बॉक्स धोकादायक स्थितीमध्ये आहेत. काही ठिकाणी झाकणे बसविलेली नाहीत. काही ठिकाणी बांबूचा टेकू लावण्यात आला आहे. नागरिकांनी विजेचा पोल, किंवा डीपी बॉक्सला हात लावू नये. विशेषत: लहान मुलांना खेळताना डीपी बॉक्स व विजेच्या खांबाला हात लावू देवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.