नवी मुंबई : शालेय पोषण आहारामध्ये महिन्याला ५० लाख व वर्षाला ६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार होत आहे. पोषण आहारासाठीचे तांदूळ व इतर साहित्य दुसरीकडे विक्री केले जात आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या चिक्कीची रेल्वेमध्ये विक्री होत असल्याचा सनसनाटी आरोप सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक देविदास हांडे पाटील यांनी केला आहे.माध्यमिक शाळांमधील ९वी व १०वीच्या विद्यार्थ्यांकरिता अन्नमित्र फाउंडेशनच्या वतीने मध्यान्ह भोजन पुरविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर बोलताना देविदास हांडे पाटील यांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असलेल्या मध्यान्ह भोजनामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात पोषण आहारासाठीचा तांदूळ व डाळ व इतर साहित्य पुरविण्यात येत असते. शहरातील अनेक शाळांना भेटी दिल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना निश्चित केलेल्या प्रमाणाएवढा आहार दिला जात नाही. अनेक विद्यार्थी गैरहजर असतात. त्या विद्यार्थ्यांसाठीच्या साहित्याचे नक्की काय होते? असा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा कमी अन्न का दिले जाते? याविषयी विचारणा केली असता विद्यार्थी कमी खात असल्यास त्यांना बळजबरीने देता येत नसल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थी आहार पूर्णपणे घेत नसतील व अनेक विद्यार्थी गैरहजर असतील तर उरलेले साहित्य जाते कोठे? याविषयी कोणालाही उत्तर देता येत नाही. वास्तविक शालेय पोषण आहाराचे साहित्य शाळांमध्ये घेताना त्यांची फक्त नोंद न घेता त्यांचे चित्रीकरण होणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त केले.महापालिका शाळांमध्ये गेल्यानंतर भयंकर प्रकार निदर्शनास आला आहे. गैरव्यवहार होत असल्याची शंका निर्माण झाली आहे. प्रत्येक महिन्याला तब्बल ५० लाख रुपयांचा गैरव्यवहार सुरू असून वर्षाला हा आकडा ६ कोटी रुपयांवर गेला असल्याचा आरोपही हांडे पाटील यांनी केला आहे. शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांनाच दिला जातो की दुसरीकडे जातो, याची चौकशी झाली पहिजे. विद्यार्थ्यांना चिक्की दिली जाते; परंतु प्रत्यक्षात तिचे वाटप विद्यार्थ्यांना कमी व बाहेरच जास्त होत आहे. रेल्वेमध्ये ती चिक्की विकली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. येणाºया हिवाळी अधिवेशनामध्ये या प्रश्नावर आवाज उठविण्याचे आवाहन अनेक आमदारांना केले असून आम्ही गप्प बसणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय शाळा क्रमांक ३८ व ७४च्या गैरसोयींविषयीही त्यांनी नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी केलेल्या आरोपांची गंभीर दखल घेण्यात यावी व सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी केली आहे.इतिवृत्त मंजूर न होताच प्रस्ताव स्थायीमध्ये-माध्यमिक शाळांमधील ९वी व १०वीच्या विद्यार्थ्यांना अन्नमित्र फाउंडेशन मुंबई यांच्याकडून मध्यान्ह भोजन पुरविण्याचा ठराव सप्टेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. ९८ लाख रूपये खर्चाचा हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीमध्ये आला होता. वास्तविक गत महिन्याच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मंजूर न होताच, तो स्थायी समितीमध्ये आला असल्याचे शिवसेनेच्या नामदेव भगत यांनी निदर्शनास आणून दिले.इतिवृत्त मंजूर होईपर्यंत महासभेचे कामकाज नियमित होत नाही. अशा स्थितीमध्ये हा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केल्यास सदस्य अडचणीत येतील, असे मत व्यक्त केले. याविषयी विचारणा केली असता सचिवांनी, अशाप्रकारे प्रस्ताव येत असतात, असे सांगताच त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. जर कोणी यापूर्वी अशाप्रकारचे प्रस्ताव आणले असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असेही सुचविले. अखेर इतिवृत्त मंजुरीशिवाय कामकाज नियमित होत नाही, हे प्रशासनाने मान्य केले व इतिवृत्त मंजुरीच्या अधिन राहून मध्यान्ह भोजनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या चिक्कीची रेल्वेत होते विक्री, पोषण आहारामध्ये ६ कोटींचा भ्रष्टाचार, राष्ट्रवादी नगरसेवकाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 2:40 AM