दोन तासात शोधला ६ लाखांचा ऐवज, नेरूळची घटना
By सूर्यकांत वाघमारे | Published: May 14, 2023 09:46 PM2023-05-14T21:46:51+5:302023-05-14T21:47:09+5:30
रिक्षातून पडलेल्या बॅगचा घेतला शोध
नवी मुंबई : रिक्षातून प्रवासादरम्यान हरवलेली दागिन्यांची बॅग नेरुळ पोलिसांनी अवघ्या दोन तासाच्या प्रयत्नात शोधून दिली आहे. त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ६ लाखाचा ऐवज होता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस रिक्षाचालकापासून ते रिक्षातून पडलेली बॅग उचलनाऱ्यापर्यंत अवघ्या दोन तासात पोहचले.
जुईनगर येथे राहणाऱ्या सुरेखा फुलसे (५०) यांच्या बाबतीत रविवारी सकाळी हा प्रकार घडला. लातूर येथून त्या बसने नवी मुंबईत आल्या असता, एलपी पुलालगत उतरल्या होत्या. तिथून त्यांनी सोबतचे सर्व साहित्य घेऊन जुईनगर पर्यंत रिक्षाने प्रवास केला. मात्र घरी गेल्यावर केवळ दागिन्यांची बॅग साहित्यामध्ये नसल्याचे आढळून आले. यामुळे त्यांनी नेरुळ पोलिसठाने गाठले असता पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवली.
त्यासाठी सहायक निरीक्षक नितीन खाडे, पोलिस शिपाई गणेश आव्हाड, पुरुषोत्तम भोये, प्रशांत बेलोटे, प्रवीण लहानगे यांचे पथक तयार करण्यात आले. त्यांनी तक्रारदार यांनी केलेल्या उल्लेखाप्रमाणे सीसीटीव्ही तपासून रिक्षाचा शोध घेतला. मात्र रिक्षा चालकाने आपल्याला त्यांची बॅग सापडली नसल्याचे सांगितले. त्यामुळे दागिन्यांची बॅग नेमकी कुठे गेली याचा शोध घेण्याला सुरवात केली.
यासाठी पोलिसांनी एलपी पुलापासून ते जुईनगर पर्यंतच्या प्रवास मार्गावरील प्रत्येक ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये एका ठिकाणी रिक्षातून बॅग पडल्याचे व एक व्यक्ती ती बॅग घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिसांनी सदर परिसरात जाऊन त्या व्यक्तीचा शोध घेतला असता त्या व्यक्तीने देखील ती बॅग सुरक्षित ठेवल्याचे समोर आले.
हि बॅग पोलिस ठाण्यात आणून उघडली असता त्यामध्ये दहा तोळे सोन्याचे दागिने, दहा तोळे चांदीचे दागिने व १६ हजाराची रोकड असा सुमारे ६ लाखाचा ऐवज होता असे पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी सांगितले. तर अवघ्या दोन तासात पोलिसांनी शीघ्र गतीने तपास करून लाखमोलाचा ऐवज मिळवून दिल्याबद्दल फुलसे यांच्या कुटुंबीयांनी देखील पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले.