नवी मुंबई : सिडकोच्या शिल्लक ११00 घरांसाठी तब्बल ६0 हजार अर्ज प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे त्यापैकी ४२ हजार ग्राहकांनी अनामत रक्कम भरून अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अर्ज भरण्याची उद्याची अंतिम मुदत असल्याने अखेरच्या दिवसांत अर्जाच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केली आहे.सिडकोने आॅगस्ट २0१८ मध्ये पंधरा हजार घरांचा योजना जाहीर केली होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी असलेल्या या मेगागृहप्रकल्पातील घरांसाठी राज्यभरातून सुमारे दोन लाख अर्जदारांनी अर्ज भरले होते. यातील पात्र अर्जदारांची आॅक्टोबर महिन्यात संगणकीय सोडत काढण्यात आली. परंतु काही विभागातील घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या गृहप्रकल्पातील ११00 घरांची विक्री झालेली नाही. या शिल्लक घरांसाठी सिडकोने १ जानेवारीपासून नव्याने अर्ज मागविले होते. मागील तीस दिवसांत या शिल्लक घरांसाठी तब्बल ६0,000 अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज भरण्याचा उद्याचा अखेरचा दिवस आहे. दरम्यान, प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून पात्र अर्जाची १४ फेब्रुवारी रोजी संगणकीय सोडत काढली जाणार असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.शिल्लक घरांचा तपशीलतळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये १४,८३८ घरांचा मेगागृहप्रकल्प उभारला जात आहे. संगणकीय सोडतीनंतर त्यातील ११00 घरे शिल्लक आहेत. यापैकी सर्वाधिक घरे द्रोणागिरी आणि तळोजा नोडमध्ये आहेत. यातील बहुतांशी घरे खुले गटासाठी आरक्षित असून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत या घरांचे निर्माण कार्य केले जात आहे.
सिडकोच्या शिल्लक घरांसाठी ६0 हजार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 11:56 PM