पनवेलमध्ये ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात
By admin | Published: February 14, 2017 05:00 AM2017-02-14T05:00:38+5:302017-02-14T05:00:38+5:30
पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी २३ व पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत
पनवेल : पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी २३ व पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या ४२ पैकी १९ जणांनी व पंचायत समितीच्या ८० पैकी ४१ जणांनी अर्ज मागे घेतले.
च्जि.प केळवणे व वडघर येथे भाजपच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तेथे शेकाप व शिवसेनेत सरळ लढत होणार आहे. भाजपच्या उमेदवारींनी अर्ज मागे घेतल्याने भाजप - सेना पनवेलमध्ये युती झाल्याची चर्चा आहे. वावंजे व नेरे येथे तिरंगी लढत सेना, भाजप व शेकापमध्ये होणार आहे. पाली-देवदमध्ये चौरंगी लढत असून भाजप, शेकाप, बहुजन समाज पार्टी व भारिप बहुजन समाज पार्टी या उमेदवारांमध्ये लढत होईल. गव्हाणमध्ये सेना, भाजप, शेकापक्ष व दोन अपक्ष अशी लढत होणार आहे.
पंचायत समितीसाठी १६ जागांसाठी भाजप १४, शिवसेना ८, शेकापक्ष ११, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४ व अपक्ष २ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चिंध्रण, नेरे, पाली देवद, पळस्पे, कोन, पोयंजे, करंजाडे, वडघर, केळवण व आपटा या १० ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे तर वावंजे, आदई, विचुंबे, गुळसुंदे व वहाळ या ५ ठिकाणी तिरंगी लढत व गव्हाणला चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पोयंजे, करंजाडे या दोन ठिकाणी भाजपने माघार घेतली आहे तर शेकापक्षाने ४ जागा आघाडीसाठी सोडल्या आहेत.