लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : अझेरबाईजान देशात नोकरीला लावतो सांगून २५ तरुणांकडून ६२ लाख उकळल्याची घटना समोर आली आहे. पैसे घेतल्यानंतर संबंधिताने त्यांना नोकरीला न लावता पोबारा केला आहे. याप्रकरणी एकावर रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फसवणूक झालेले तरुण केरळचे राहणारे आहेत.
अझेरबाईजान देशात पेट्रोलिंग ड्रिलिंग रिंग कामासाठी मोठ्या संख्येने कामगार हवे असल्याची जाहिरात किशोर चौधरी नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर केली होती. त्यावरून मूळच्या केरळच्या व सध्या नेरुळला राहत असलेल्या अनिषकुमार एस यांची त्याच्यासोबत ओळख झाली होती. अनिषकुमार हे विदेशात नोकरीला इच्छुक असल्याने त्यांनी रबाळे एमआयडीसीत किशोरची भेट घेतली होती. यावेळी किशोर चौधरी याने नोकरीची हमी देऊन प्रत्येकी २ लाख रुपये व इतर खर्चाचे पैसे द्यावे लागतील असे सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून अनिषकुमार यांनी त्यांच्या परिचयाच्या २५ इच्छुकांची किशोर चौधरीसोबत संपर्क करून दिला होता.
या सर्वांना नोकरीला लावण्याची त्याने हमी दिल्याने त्यांनी २०२० मध्ये किशोरला एकूण ६२ लाख १० हजार रुपये दिले होते. यानंतर काही महिन्यांनी त्याने सर्वांचे तिकीट, व्हिजा पाठवले होते. परंतु नोकरीचे नियुक्ती पत्र पाठवले नव्हते. यावरून त्यांनी दिलेले पैसे परत मागण्याचा तगादा लावला असता त्याने सुमारे ४ लाख ३५ हजार रुपये परत केले होते. परंतु उर्वरित ५७ लाख ७५ हजार परत करण्यास टाळाटाळ करत होता. त्यातच काही महिन्यांपासून त्याने सर्वांशी संपर्क देखील तोडला. यावरून आपली फसवणूक झाल्याचे तरुणांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी सोमवारी रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली असता, सोमवारी रात्री किशोर चौधरी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये इतरही अनेकांची फसवणूक झाल्याचं शक्यता नाकारता येत नाही.