नवी मुंबईतील ६३२ वृक्षराजींची होणार कत्तल; ८४ झाडांचे पुनर्रोपण 

By नारायण जाधव | Published: July 12, 2023 06:47 PM2023-07-12T18:47:53+5:302023-07-12T18:48:08+5:30

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील तुर्भे एमआयडीसी आणि पाच बीच परिसरातील दोन प्रकल्पांसाठी ६३२ झाडांचा बळी जाणार आहे.

632 trees in Navi Mumbai will be slaughtered Replanting of 84 trees | नवी मुंबईतील ६३२ वृक्षराजींची होणार कत्तल; ८४ झाडांचे पुनर्रोपण 

नवी मुंबईतील ६३२ वृक्षराजींची होणार कत्तल; ८४ झाडांचे पुनर्रोपण 

googlenewsNext

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील तुर्भे एमआयडीसी आणि पाच बीच परिसरातील दोन प्रकल्पांसाठी ६३२ झाडांचा बळी जाणार आहे. तर ८४ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक झाडांचा बळी ‘एचपीसीएल’ अर्थात हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन घेणार आहे. ‘एचपीसीएल’ त्यांच्या टीटीसीत टीटी १ टर्मिनलच्या विकासासाठी ४५० झाडांची कत्तल करणार असून, ५२ झाडांचे पुनर्रोपण करणार आहे. तर नवी मुंबई महापालिका तिच्या बहुप्रतिक्षित पाच बीच मार्गावरील सानपाडा येथील भुयारी मार्गासाठी १९२ झाडांचा बळी घेणार आहे. याशिवाय ३२ झाडांचे पुनर्रोपण करणार आहे.

याबाबत एमआयडीसीने ‘एचपीसीएल’चा तर नवी मुंबई महापालिकेने पाच बीच मार्गावरील भुयारी मार्गासाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव राज्य वृक्ष प्राधिकरण समितीकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला वृक्ष प्राधिकरण समितीने आपल्या सातव्या बैठकीत मंजुरी दिली आहे. वृक्षकत्तलीस मंजुरी मिळाल्यामुळे दोन्ही प्रकल्पांच्या बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात भरदार वृक्षांचा बळी जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींत नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

भरपाईच्या वृक्षलागवडीसाठी जागा नाही
एचपीसीएल त्यांच्या टीटीसीत टीटी १ टर्मिनलसाठी ज्या झाडांचा बळी घेणार आहे, त्यांचे सरासरी आयुष्यमान ५०६४ वर्षे आहे. यामुळे त्या बदल्यात तेवढीच वृक्षलागवड त्यांना करावी लागणार आहे. यात ज्या जातीच्या वृक्षांचा बळी जाणार आहे, तीच लागवड एचपीसीएलला करावी लागणार आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेली १.३ हेक्टर जागा एचपीसीएलने सुचविलेली आहे, ती पुरेशी नाही, असे निरीक्षण राज्य वृक्ष प्राधिकरण समितीने नोंदविले आहे. यामुळे त्यांनी पुरेशी जागा शोधून तिचे ताबा पत्र राज्य वृक्ष प्राधिकरण समितीला सादर करायचे आहे.

पाम बीच भुयारी मार्गात १९२ झाडांचा बळी
पाम बीच मार्गावर सानपाड्यात सेक्टर १९ येथे केशर सॉलिटायरजवळ नवी मुंबई महापालिका जो आरसीसी बॉक्स टाइप हा भुयारी मार्ग ३० हजार ३०० मीटर क्षेत्रावर बांधणार आहे. त्यासाठी ९२ झाडांची कत्तल करावी लागणार असून, ३२ झाडांचे पुनर्रोपण करावे लागणार आहे. या झाडांचे सरासरी आयुष्यमान ६०६३ वर्षे आहे. यामुळे त्या बदल्यात तेवढ्या प्रमाणात स्थानिक वृक्षांची लागवड करण्याचे बंधन महापालिकेस वृक्ष प्राधिकरण समितीने घातले आहे.

वृक्ष प्राधिकरण समिती म्हणजे रबर स्टॅम्प
महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरण समिती म्हणजे वृक्ष कत्तलीचे एक हत्यारच बनली आहे. ही समिती फक्त वृक्षतोडीसच परवानगी देते. कधीही पर्याय सुचवित आहे. शिवाय विविध वृक्षतोडीसाठी जे प्रस्ताव पाठवितात, ते कितपत योग्य आहेत, तेवढी वृक्षतोड आवश्यक आहे की नाही, बरे जेवढ्या वृक्षतोडीस परवानगी दिली आहे, तितकीच होते की जास्त होते, हे पाहायलाही त्यांचे सदस्य कधी स्थळ पाहणी करीत नाहीत. यामुळे खरे सांगायचे झाल्यास वृक्ष प्राधिकरण समिती म्हणजे रबर स्टॅम्प झाली आहे. - सुनील अगरवाल, पर्यावरणप्रेमी, नवी मुंबई.

Web Title: 632 trees in Navi Mumbai will be slaughtered Replanting of 84 trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.