६४ देशांना आवडे भारताचा कांदा, वर्षभरात २५ लाख टन निर्यात
By नामदेव मोरे | Published: June 13, 2023 08:15 AM2023-06-13T08:15:56+5:302023-06-13T08:15:56+5:30
४५२२ कोटी रुपयांची उलाढाल
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: भारतामधून कृषी मालाची निर्यात वर्षनिहाय वाढू लागली आहे. २०२२ - २३ मध्ये विक्रमी निर्यात झाली आहे. जगभरातून भारतीय फळे, भाजीपाल्याला मागणी वाढत आहेच; पण याहीपेक्षा कांद्याला सर्वाधिक पसंती मिळत आहे. गेल्या वर्षभरात तब्बल २५ लाख २५ हजार टन कांद्याची निर्यात झाली असून त्या व्यापारातून ४५२२ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
कृषिप्रधान देश ही भारताची ओळख जगभर होऊ लागली आहे. भारतामधील फळे, भाजीपाला, प्रक्रिया केलेल्या वस्तू, अन्नधान्य, दुग्धजन्य वस्तूंना २०४ देशांमधून मागणी वाढत आहे. फळे, भाजीपाला हा नाशीवंत कृषीमाल असूनही त्यांची निर्यात वाढू लागली आहे. २०२२ - २३ मध्ये २४४३ कोटींचा भाजीपाला. ३७८ कोटींचे आंबे, २५४३ कोटींचे द्राक्ष, २७३६ कोटी रुपयांची इतर फळे निर्यात केली आहेत. या सर्व भाजीपाला व फळांपेक्षाही भारतीय कांद्याला विदेशातून सर्वाधिक पसंती मिळत आहे.
२०२० - २१ मध्ये १५ लाख ७८ हजार टन कांद्याची निर्यात होऊन २८२६ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. २०२१ - २२ मध्ये १५ लाख ३७ हजार टन कांद्याची निर्यात होऊन ३४३२ टन उलाढाल झाली होती. २०२२ - २३ या आर्थिक वर्षात विक्रमी २५ लाख २५ हजार २५८ टन निर्यात होऊन ४५२२ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे.
तीन वर्षांत ६२ टक्के वाढ
कांदा निर्यातीमध्ये व उलाढालीमध्ये तीन वर्षांत ६२ टक्के वाढ झाली आहे. यंदा ६४ देशांमध्ये कांदा निर्यात झाला आहे. बांगलादेश, मलेशीया, यूएई, श्रीलंका, नेपाळ, इंडोनेशिया, कतार, व्हिएतनाम, ओमान, कुवेत, सिंगापूर, इराक या देशांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे.