ठाणे : खाऊसाठी पैसे देतो, असे आमिष दाखवून उद्यानात नेऊन नऊवर्षीय चिमुरडीशी अश्लील चाळे करणाऱ्या नवी मुंबईतील ६५ वर्षीय लक्ष्मणप्रसाद मिठूप्रसाद या वृद्धाला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जी.पी. शिरसाठ यांनी दोषी ठरवून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा १५ डिसेंबर रोजी ठोठावली. सरकारी वकील म्हणून मुख्य सरकारी वकील संजय लोंढे यांनी काम पाहिले. ही घटना १८ डिसेंबर २०१७ रोजी नवी मुंबईतील कोपरी परिसरातील तलाव पार्क येथील उद्यानात घडली होती.
आरोपी लक्ष्मणप्रसाद घटना घडली त्या दिवशी बाकड्यावर बसला होता. त्याच्याशेजारी नऊवर्षीय मुलगीही बसलेली असल्याने बघणाºया नागरिकांना ती चिमुरडी त्याची नात असल्याचे वाटले. मात्र, प्रत्यक्षात पाहिल्यानंतर आरोपी लक्ष्मणप्रसाद त्या मुलीशी अश्लील चाळे करत असल्याचे तेथील काही नागरिकांसमोर आल्यावर त्यांनी त्याला पकडून चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले होते.त्याने त्या मुलीला खाऊसाठी १० रु पये देऊन उद्यानात आणल्याची कबुली दिली, अशी माहिती लोंढे यांनी न्यायालयासमोर मांडून आरोपीला जास्तीतजास्त शिक्षा ठोठावावी, असा युक्तिवाद केला. तर, बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपी वृद्धाचे वय आणि घरातील एकमेव कमावता असल्याचे सांगून शिक्षेबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची विनंती न्यायालयाला केली.बाललैंगिक शोषण प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा असल्याने आरोपीवर लावलेले आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्षाने सादर केलेल्या साक्षीपुराव्याच्या आधारे लक्ष्मणप्रसादला दोन वर्षे कारावास आणि एक हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली.