महापालिका तिजोरीवर पडणार ‘त्या’ गावांचा ६६०० कोटींचा बोजा

By नारायण जाधव | Published: March 8, 2024 09:21 PM2024-03-08T21:21:54+5:302024-03-08T21:22:21+5:30

निधी उभा करण्याचे मोठे आव्हान : नगरविकासकडून कोणतेही आश्वासन नाह.

6600 crore burden of those villages will fall on the municipal treasury | महापालिका तिजोरीवर पडणार ‘त्या’ गावांचा ६६०० कोटींचा बोजा

महापालिका तिजोरीवर पडणार ‘त्या’ गावांचा ६६०० कोटींचा बोजा

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या ठाणे-कल्याणच्या वेशीवरील १४ गावांचा पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यावर अखेर नगरविकास विभागाने गुरुवारी शिक्कामोर्तब केले आहे. एकेकाळी वाढीव मालमत्ताकराच्या प्रश्नांवर नवी मुंबई महापालिकेतून २००५ पासून बाहेर पडल्याने ती गावे आणि त्यांच्या परिक्षेत्राची बजबजपुरी झाली आहे. यामुळे त्यांना नवी मुंबईच्या स्तरावर आणण्यासाठी विकास आराखड्यानुसार किमान पायाभूत पुरविण्यासाठी ६६०० कोटींची गरज भासणार आहे.
या गावांसाठी इतका मोठा निधी कसा उभा करायचा याचे मोठे आव्हान आता महापालिका प्रशासनासमाेर असणार आहे. कारण या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करताना नगरविकास विभागाने महापालिकेस कोणतेही आश्वासन दिलेले नाही. निघू, मोकाशीपाडा, नावाळी, भंडार्ली, पिंपरी गाव, गोटेघर, बंबार्ली, उत्तरशिव, नागाव, नारीवली, वाकळण, बाळे आणि दहीसर मोरी, ही ती गावे आहेत.
 
गावांच्या समावेशाचा पूर्व इतिहास
- २००१ मध्ये महापालिकेतून बाहेर पडल्यानंतर गेल्या २३ वर्षांत या गावांमध्ये ठाणे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व एमएमआरडीएने सुविधा पुरविलेल्या नाहीत. यामुळे गावांचा विकास रखडल्याने आमचा नवी मुंबई महापालिकेत पुन्हा समावेश करावा, अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली होती. यासाठी आंदोलने, निदर्शने केली होती.
- अखेर एकनाथ शिंदे हे नगरविकासमंत्री असताना मार्च २०२२ मध्ये गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा त्यांनी केली होती. स्थानिकांनी पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी स्थापन केलेल्या सर्व पक्षीय विकास समितीद्वारे पाठपुरावा सुरूच ठेवला होता.
- यानंतर २०१५ मध्ये ती गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावीत, असा अशासकीय ठराव मंजूर करण्यात आला. अखेर २४ फेब्रुवारी २०२२ रोजी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री यांनी ती नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले. तर, मार्च २०२२ च्या अधिवेशनात नगरविकासमंत्र्यांनी त्यांच्या महापालिकेत समावेशाची घोषणा केली.
..........
महापालिकेने या सुविधा निर्माण केल्या
१९९२ मध्ये १४ गावांचा समावेश नवी मुंबई पालिकेत करण्यात आला. त्यानंतर महापालिकेनेही या गावांसाठी नळ योजना, रस्ते अशा काही पायाभूत सुविधा निर्माण केल्या होत्या. यात नावाळीत माता-बाल रुग्णालयही बांधले होते. या भागातून १९९५ व २००० या दोन पालिका निवडणुकीत दोन नगरसेवक निवडूनही आले होते.
..........
असा हवा निधी
- आता महायुती सरकारने गुरुवारी ही १४ गावे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याचा शासन निर्णय काढल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असला तरी या गावांमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या तिजाेरीवर मोठा ताण पडणार आहे.
- महापालिकेत ही गावे घेण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रारूप विकास आराखड्यानुसार तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ६६०० कोटी रुपयांची गरज भासणार असल्याचे महापालिकेने नगरविकास विभागास कळविले होते.
- यात एकत्रित क्षेत्रासाठी ६१०० कोटी तर निव्वळ गावठाणांतील सुविधांसाठी ५९१ काेटी लागतील, असे महापालिकेने नगरविकास कळविले हाेते, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी ‘लाेकमत’ला दिली.

Web Title: 6600 crore burden of those villages will fall on the municipal treasury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.