कर्जत : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागेसाठी २१ फेब्रुवारीलानिवडणूक होणार आहे. सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी आहे. आजच्या पाचव्या दिवशी सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवाराचे नामनिर्देशनपत्रे दाखल केली. राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांच्या आघाडीने तसेच शिवसेना या पक्षांनी शक्ती प्रदर्शन करून आपल्या उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले तर काँग्रेस, मनसे आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज पर्यंत कर्जत तालुक्यात एकूण ६७ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद प्रभागाचे सहा गट आहेत तर पंचायत समिती प्रभागाचे बारा गण आहे. २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. ६ फेब्रुवारी पर्यत नामनिर्देशनपत्र भरावयाचा कालावधी आहे, १ ते ५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद (गट) साठी १९ तर पंचायत समिती (गण) साठी ४८ असे एकूण ६७ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे आज एका दिवसात जिल्हा परिषद गटासाठी १६ तर पंचायत समिती गणासाठी ३६ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भडकवाड यांनी दिली.रविवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे सुधाकर घारे, रवींद्र देशमुख, चित्रा ठाकरे , शिवसेनेच्या वतीने विद्यमान उपसभापती मनोहर थोरवे, कॉंग्रेस पक्षाच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य अनुसूया पादीर, भाजपाच्या वतीने रमेश चव्हाण, मनसेच्या वतीने रघुनाथ मसणे आदींचा समावेश आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तानाजी चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष उत्तम जाधव, जिल्हा परिषद सदस्या पूजा थोरवे, शहराध्यक्ष शरद लाड, नगरसेवक राजेश लाड, नगराध्यक्ष रजनी गायकवाड, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश दळवी, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक बेहेरे, रमेश मुंढे, मनसे जिल्हा प्रवक्ता प्रवीण गांगल आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
कर्जत तालुक्यातून ६७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे
By admin | Published: February 06, 2017 4:56 AM