नवी मुंबईमध्ये वर्षभरात आगीच्या ६८२ घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:05 PM2020-02-25T23:05:14+5:302020-02-25T23:05:31+5:30
शहरातील १,७८० ठिकाणी मदतीसाठी धावले अग्निशमनचे जवान
नवी मुंबई : नवी मुंबईमध्येही आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. वर्षभरामध्ये तब्बल ६८२ ठिकाणी आग लागल्याची नोंद झाली आहे. रेस्क्यू आॅपरेशन, अपघातासह एकूण १,७८० ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांना मदतीसाठी धाव घ्यावी लागली होती. अनेक सरकारी अस्थापनांसह निवासी इमारतींमध्येही अग्निशमन यंत्रणा सुरू नसल्याचे निदर्शनास आले आहे.
नवी मुंबई सुनियोजित व देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरांपैकी एक असल्याची प्रसिद्धी केली जाते; परंतु प्रत्यक्षात येथील नागरिकांमध्येही अग्निशमन नियमांविषयी उदासीनता असल्याचे निदर्शनास आले आहे. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, आकाशाला भिडणाऱ्या उंच इमारती, सरकारी कार्यालये व व्यावसायिक आस्थापनांमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. आग लागू नये यासाठी काळजी घेतली जात नसल्याचे अनेक दुर्घटनांच्या नंतर स्पष्ट झाले आहे. यामुळे प्रतिदिन १ ते २ ठिकाणी आग लागत आहे. रेस्क्यू आॅपरेशनसाठीही प्रतिदिन किमान एकतरी कॉल येऊ लागला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षभरामध्ये अग्निशमन दलाच्या पाच कार्यालयांमध्ये एकूण १,७८० कॉल आले आहेत. यामधील ६११ ठिकाणी आग लागली होती. रेस्क्यू आॅपरेशनसाठी ४५९, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यामुळे ४९, इतर ६४४ व अपघातांचे १७ कॉल आले आहेत. पाच कार्यालयांमध्ये मिळून प्रतिदिन जवळपास चार कॉल आल्याचे अग्निशमनच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
महापालिका क्षेत्रातील दुर्घटनांच्या घटनांमध्ये रस्ते अपघातांपेक्षा आगीच्या घटनांची संख्या वाढत आहे. आग लागलेल्या बहुतांश ठिकाणी आगनियंत्रण यंत्रणा कार्यरत नसल्याचे निदर्शनास येते. औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यांनी त्यांच्याकडील साठ्याची माहिती प्रवेशद्वारावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. कंपनीमध्ये कोणत्या प्रकारचे व किती प्रमाणात रसायन आहे, याचा तपशील या फलकावर नोंद करणे आवश्यक आहे. सर्व कंपन्यांमध्ये आगनियंत्रण यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे; परंतु अनेक कारखानदार याकडे दुर्लक्ष करतात. इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र मिळेपर्यंत तेथील अग्निशमन यंत्रणा सुरू असते. त्यानंतर त्याची देखभाल केली जात नसल्याने आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
तुर्भेतील डम्पिंगला आग
तुर्भेतील पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याची माहिती वाशी अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानुसार दुपारी २:३० च्या सुमारास बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्या दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली; परंतु आगीचे नेमके कारण समोर आलेले नाही. अज्ञाताकडून ही आग लावली गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही त्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी घडलेल्या आगीच्या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता.
नवी मुंबई क्षेत्रातील आतापर्यंतच्या मोठ्या आगीच्या घटना
२४ मार्च २०१२ - कोपरखैरणेमधील जुन्या डम्पिंग ग्राउंडला आग, भंगार वाहनांसह लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
१९ आॅगस्ट २०१३ - सीबीडी सेक्टर ११ मधील अग्रवाल ट्रेड सेंटरच्या सहाव्या मजल्यावर आग
१९ एप्रिल २०१४ - वाशीमधील नवी मुंबई मर्चंट चेंबरच्या ए मार्ट शॉप या दुकानामधये भीषण आग
३१ आॅक्टोबर २०१५ - सीवूड इस्टेट इमारतीमधील १५ व्या मजल्यावरील सदनिकेला भीषण आग
२४ मे २०१६ - सीबीडी सेक्टर १५ मधील ब्रिव्ह हाउस कॅफेमध्ये आग
नोव्हेंबर २००६ - एमआयडीसीमधील सावला कोल्ड स्टोरेजला भीषण आग
२०१८ मधील तपशील
जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये शहरात आगीच्या ६८२ घटना घडल्या होत्या. ४०१ ठिकाणी रेस्क्यू आॅपरेशन, २६ ठिकाणी अत्यावश्यक मदत, ५२५ इतर घटना व ३१ अपघात, अशा वर्षभरात १,६६५ वेळा अग्निशमन जवानांना मदतीसाठी धाव घ्यावी लागल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.