नवी मुंबईत वर्षभरामध्ये ६,८९५ गुन्हे दाखल; सायबर गुन्ह्यांचे आव्हान कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 11:30 PM2020-01-16T23:30:18+5:302020-01-16T23:31:36+5:30
अपघातांची संख्या झाली कमी; अमली पदार्थ माफियांचे कंबरडे मोडले
नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये २०१८ च्या तुलनेमध्ये गुन्ह्यांची संख्या कमी करण्यात पोलिसांना यश आले आहे. २०१८ मध्ये तब्बल ७,०१३ गुन्हे दाखल झाले होते. २०१९ मध्ये ६,८९५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. वर्षभरामध्ये अपघातांचे प्रमाण कमी झाले असून, अमली पदार्थमाफियांचे कंबरडे मोडले आहे; परंतु महिलांवरील अत्याचार व सायबर गुन्ह्यांमध्ये मात्र वाढ झाली असून, सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान पोलिसांसह नागरिकांसमोरही उभे राहिले आहे.
नवी मुंबई, पनवेल व उरण परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. देशातील स्वच्छ शहरांच्या व राहण्यासाठी सर्वोत्तम शहराच्या यादीमध्ये नवी मुंबईचा समावेश होत आहे. या परिसरामधील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुन्ह्यांची संख्या नियंत्रणात येण्यापासून गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आयुक्तांनी पत्रकार परिषदेमध्ये वर्षभर केलेल्या कामगिरीची माहिती दिली. या वेळी सहआयुक्त राजकुमार व्हटकर, परिमंडळ एकचे उपायुक्त पंकज डहाणे, परिमंडळ दोनचे उपायुक्त अशोक दुधे, सुनील लोखंडे, प्रवीण पाटील उपस्थित होते. गत वर्षभरामध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका शांततेमध्ये पार पाडण्यात पोलिसांनी यश मिळविले. कळंबोली-सुधागड शाळेजवळ बॉम्ब ठेवणाऱ्या तीन आरोपींना अटक केली. एनआरआयमध्ये घरफोडी करणाºया दोघांना अटक करून २६ गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्याकडून १,३०२ गॅम सोन्यासह एकूण ४१ लाख ७८ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. तुर्भेमध्ये एमएलएम स्किम चालविणाºया कार्यालयावर धाड टाकून आरोपींना अटक केली. तळोजामधून ट्रेलरचा मागील भाग चोरणारी टोळी गजाआड करून ११ गुन्हे उघडकीस आणले. ५९ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
उरण खोपटा ब्रिजजवळील आक्षेपार्ह मजकूर, खारघर रेल्वे स्टेशन जवळील आक्षेपार्ह मजकुराच्या गुन्ह्याचाही योग्यपद्धतीने तपास केला. वर्षभर पोलिसांनी २३७ शांतता कमिटीच्या बैठका घेतल्या, मोहल्ला कमिटीच्या २१४ व इतर १,७५२ बैठका घेतल्या. अमली पदार्थ विरोधी पथकाने वर्षभरामध्ये धडाकेबाज कामगिरी केली. ९५ लाख ७६ हजार रुपयांचे एम्फेटामाईन पावडर, २९ लाख ३९ हजार रुपये किमतीचा १८० किलो गांजा, २७ लाख सहा हजार रुपये किमतीचे ६७७ ग्रॅम वजनाचे केटामाईन, १६ लाख रुपये किमतीचे तीन किलो ९८० ग्रॅम वजनाचे चरस असा एकूण एक कोटी ९८ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. वर्षभरामध्ये सायबर गुन्ह्यांची संख्या वाढू लागली आहे. पोलिसांनी सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यावर विशेष लक्ष दिले असून, नागरिकांनीही हे गुन्हे रोखण्यासाठी दक्ष राहवे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
अमली पदार्थ विरोधी धडक मोहीम
पोलिसांनी वर्षभर अमली पदार्थांच्या विरोधात जोरदार मोहीम राबविली. २०१८ मध्ये ४४ गुन्हे दाखल झाले होते. ७२ जणांना अटक केली होती. एक कोटी ७८ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. २०१९ मध्ये १५४ गुन्हे दाखल झाले असून, तब्बल २४५ गुन्हे दाखल झाले आहेत. तब्बल दोन कोटी ८० लाख ७५ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
ओळखीच्या व्यक्तींकडूनच महिलांवर अत्याचार
वर्षभरामध्ये महिलांविषयी अत्याचाराचे जवळपास ६०२ गुन्हे दाखल झाले आहेत. बहुतांश गुन्ह्यांमध्ये ओळखीच्या व्यक्तींनीच महिलांवर अत्याचार केल्याचे निदर्शनास आले आहे. बलात्काराचे एकूण १६९ गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये लग्नाचे आमिष दाखवून ५७ गुन्हे, नातेवाईक, मित्र व ओळखीच्या व्यक्तींकडून १११ व अनोळखी व्यक्तीकडून अत्याचार केल्याचा एक गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयात बलात्काराच्या १७ केसेस निकाली लागल्या आहेत. यापैकी एक गुन्हा रद्द झाला आहे. १४ प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होण्यापुर्वी फिर्यादीची संमती असल्याचे निदर्शनास आले आहे. सात प्रकरणांमध्ये फिर्यादी कोर्टात फितूर झाले. सुनावनीदरम्यान सात प्रकरणांमध्ये फिर्यादीवर जबरदस्ती झाली नव्हती, असे निदर्शनास आले आहे.
१२६ शस्त्र परवाने रद्द
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामधील तब्बल १२६ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय वर्षभरामध्ये १०४ जणांची शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ज्यांनी शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण केले नाही त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. आर्म अॅक्ट अंतर्गत वर्षभरामध्ये ३३ गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील यावर लक्ष केंद्रित केले होते. लोकसभा, विधानसभा व ग्रामपंचायत निवडणुका शांततेमध्ये पार पडल्या. कळंबोली बॉम्बसह अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आले आहे. अपघातांची संख्या कमी झाली असून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्हे नियंत्रणासाठी नागरिकांनीही दक्ष राहिले पाहिजे. - संजय कुमार,
पोलीस आयुक्त