उलवेत बनावट रॉयल्टी चलनप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 10:13 AM2020-07-18T10:13:57+5:302020-07-18T10:14:28+5:30
कलेक्टर विभागाच्या चौकशीत बनावट चलन हाती लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
नवी मुंबई - बनावट चलन बनवून 5 लाखाची रॉयल्टी चुकवल्याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलेक्टर विभागाच्या चौकशीत बनावट चलन हाती लागल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
उलवे येथील खदाणीतून रॉयल्टी चुकवून खडी विक्री होत असल्याची माहिती कलेक्टर विभागाला मिळाली होती. त्यानुसार काही अधिकाऱ्यांनी खडी वाहतूक करणाऱ्यांकडे रॉयल्टी भरल्याच्या चलनाबद्दल विचारणा केली होती. यावेळी एका व्यक्तीने जमा केलेले चलन बनावट असल्याचे समोर आले. त्यानुसार उलवेमधील एका घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या नावे बनावट चलन पुस्तिका बनवल्याचे आढळून आले. प्रत्यक्षात त्यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. शिवाय शासनाचा रबर स्टॅम्प देखील आढळून आला.
याबाबत ओमप्रकाश उपाध्याय या व्यक्तीकडे चौकशी केली असता सहा व्यक्तींच्या सांगण्यावरून त्याने बनावट चलन व स्टॅम्प बनवल्याचे सांगितले. या चलनाद्वारे त्यांनी रेती व खडीची विक्री करून शासनाची सुमारे 5 लाखांची रॉयल्टी बुडवल्याचे उघड झाले. त्यानुसार घडलेल्या प्रकाराविरोधात एनआरआय पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांनी सांगितले. तर यामध्ये इतरही कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत.