पामबीच रोडवर ७ किमी मानवी साखळी; हाती तिरंगा घेत स्वच्छतेसाठी जनजागृती
By नामदेव मोरे | Published: September 22, 2022 08:49 AM2022-09-22T08:49:42+5:302022-09-22T08:50:29+5:30
नवी मुंबईचा क्वीन नेकलेस म्हणून ओळख असलेल्या पामबीच रोडवर मोराज सर्कल ते महानगरपालिका मुख्यालयापर्यंत ही मानवी साखळी तयार करण्यात आली.
नवी मुंबई : इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने पामबीच रोडवर मानवी साखळी तयार केली होती. हजारो श्री सदस्य, महिला बचतगट, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य व नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. हातामध्ये तिरंगा घेऊन नागरिकांनी स्वच्छतेविषयी जागृती केली.
नवी मुंबईचा क्वीन नेकलेस म्हणून ओळख असलेल्या पामबीच रोडवर मोराज सर्कल ते महानगरपालिका मुख्यालयापर्यंत ही मानवी साखळी तयार करण्यात आली. यामध्ये नानासाहेब धर्माधीकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील महिला बचत गट, राजकीय, सामाजीक संघटनांचे प्रतिनिधी व हजारो नागरिक सहभागी झाले होते. तिरंगा हातामध्ये घेऊन स्वच्छतेचा संदेश प्रसारीत करण्यात आला. स्वच्छता ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक नागरिकाने यामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. ओला, सुका कचरा वेगाळ करणे, सार्वजनीक ठिकाणी अस्वच्छता हाेणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. जवळपास सात किलोमीटर लांबीची मानवी साखळी करण्यात आली होती.